Sanjay Raut : फडणवीसांच्या शेजारी ड्युप्लिकेट लोकं बसलेत – राऊतांचा शिंदेंवर निशाणा
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंना केलेल्या ऑफरवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी एकनाथ शिंदेंना "डुप्लीकेट शिवसेना" म्हणत जोरदार टोला लगावला. शिवसेना चिन्हावर सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यावर विश्वास व्यक्त करताना, त्यांनी फडणवीसांच्या विधानाला "टाळीची वाक्ये" म्हटले.

तुम्हाला या बाजूने यायचं असेल तर बघा , इकडे यायला स्कोप आहे, अशी ऑफर काल सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिली होती. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात खसखस पिकली, पण त्याच विधानामुळे विविध चर्चांना उधाण आले. मात्र त्यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खास शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटाईत आहेत, त्यांच्या शेजारी सध्या ड्युप्लिकेटलोकं बसलेत. अशा लोकांसोबत बसायचं की खऱ्या लोकांसोबत बसायचं याचा विचार त्यांनी आधी करावा असा सल्ला देतानाच त्यांनी ड्युप्लिकेट शिवसेना म्हणत नाव न घेताच एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला.
काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यानुसार त्यांनी टोमणा मारला आसेल पण ते एवढं गांभीर्याने घेण्याचीगरज नाही. शिवसेना हे नाव आणि चिन्ह यासदंर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना लढा देत आहे. आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासोबत जे ड्युप्लिकेटलोकं बसले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार आधी करावा की डुप्लीकेट लोकं ठेवायची की असली लोकं सोबत ठेवायची, सध्या तरी त्यांचा कारभार ड्युप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे, नाव न घेता राऊतांनी हा टोला एकनाथ शिंदेंना लगावला. फडणवीसांची ऑफर अजिबात गांभीर्याने घेत नाही, टाळीची वाक्य असतात सिनेमात तसंच हे आहे, असंही राऊत म्हणाले.
ही वैचारिक दिवाळखोरी
सध्या देवेंद्र फडणवीस हे ड्युप्लिकेट शिवसेनेसोबत सत्ता भोगत आहेत. ड्युप्लिकेटशिवसेना , ड्युप्लिकेट राष्ट्रवादी… त्यांना कुठलाही वैचारिक किंवा नैतिक आधार नाहीये. असं असताना तुम्ही मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला (गमतीने का होईना) सत्तेत येण्याची ऑफर देताय ही वैचारिक दिवाळखोरी आहे अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवरही टीकास्त्र सोडलं.
राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं
2029 सालापर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याचा स्कोप नाहीये, असंही काल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “राजकारण आणि बहुमत फार चंचल, अस्थिर असतं हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन दहशतावाविरोधातील युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का ? आता युद्ध सुरूच आहे, तर 56 इंचाचे छाती असलेले पंत्परधान हे लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानावरती तिरंगा फडकावूनच शांत बसतील असं आम्हाला वाटलं होतं, अशाच त्यांच्या गर्जना, आरोळ्या होत्या. पण असं झालं का , आज त्या विषयावर आवाज बंद आहे. असं म्हणत राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही” असं राऊत म्हणाले.
लौकरचं होणार इंडिया आघाडीची बैठक
उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यत आहे. तशी आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केलं. . काल काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल यांचा फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे इंडिया ब्लॉकमधील अनेक सदस्य हे अस्वस्थ आहेत. या सगळ्यांची एक बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबाबत एक दिशा ठरवणं गरजेचं आहे. अशी भावना उद्धव ठाकरेंनी मांडल्यानंतर दिल्लीत या बैठकीबाबत हालचाली सुरू आहे, तारखेसंदर्भातही चर्चा होईल असं राऊत म्हणाले.
