50 हजार ते 15 कोटी… सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांमुळे व्यापारी मालामाल, कोट्यवधींची विक्रमी उलाढाल
सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट ब्लडलाईन (वंशावळ) असलेल्या घोड्यांनी यंदा विशेष आकर्षण निर्माण केले आहे. करोडो रुपयांच्या उलाढालीमुळे हा अश्व बाजार पुष्करला मागे टाकत आहे. स्पर्धा आणि प्रजनन व्यवसायातून घोड्यांची किंमत वाढते.

अश्वांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथील ऐतिहासिक चेतक फेस्टिव्हलमध्ये यंदा उत्कृष्ट ब्लडलाईन (उत्तम वंशावळ) असलेल्या घोड्यांनी विशेष आकर्षण निर्माण केले आहे. वंशाची शुद्धता, नैसर्गिक ताकद आणि मोहक सौंदर्याचा संगम असलेल्या या ब्लडलाईन अश्वांमुळे बाजारात कोट्यवधी रुपयांची विक्रमी उलाढाल होत आहे. हा बाजार आता राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर अश्व बाजारापेक्षाही अधिक प्रसिद्धी मिळवत असल्याचे चित्र आहे.
उत्तम वंशावळ (ब्लडलाईन) असलेले घोडे हे सारंगखेडा अश्व बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंग रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम ब्लडलाईनच्या घोड्यांची किंमत लाखोंपासून करोडो रुपयांपर्यंत जाते. उत्कृष्ट वंशावळीच्या घोड्यांना असलेली मोठी मागणी पाहता त्यांची किंमत खूप जास्त असते. यंदा या यात्रेत देशभरातून ५० हजार रुपयांपासून ते तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंत किमतीचे घोडे दाखल झाले आहेत. या प्रचंड किंमतीचे कारण म्हणजे हे घोडे उत्तम ब्लडलाईनचे आणि दुर्मिळ वंशाचे असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मागणी असते.
स्पर्धांनी वाढवली घोड्यांची किंमत
सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल सध्या येथील भव्य अश्व स्पर्धांसाठी विशेष प्रसिद्ध होत आहे. स्पर्धेत विजेते ठरणाऱ्या घोड्यांची किंमत लाखो आणि कोट्यवधींमध्ये पोहोचते, असे रावल यांनी सांगितले. घोडे मालक आपल्या अश्वांना प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सहभागी करून विजेतेपद पटकावतात, ज्यामुळे त्यांच्या घोड्यांची किंमत अनेक पटीने वाढते.येत्या दोन-तीन दिवसांत आणखी चुरशीच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, त्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हॉर्स रायडिंग करणारे विद्यार्थीही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
उत्तम ब्लडलाईनमुळे घोडे व्यापारी ब्रीडिंगच्या (प्रजनन) माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत आहेत. “ब्रीडिंगसाठी असलेल्या घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांच्या एका स्टडच्या किमतीही मोठ्या असतात. हा व्यवसाय घोड्यांच्या शुद्ध वंशावळीवर आधारित असून, यात मोठी आर्थिक उलाढाल होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
१८ व्या शतकापासूनची गौरवशाली परंपरा
अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेची परंपरा १८ व्या शतकापासून सुरू असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. ४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या पारंपरिक अश्व बाजारात देशभरातून जातिवंत आणि उंचे घोडे दाखल झाले असून, यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भव्य अश्व स्पर्धांमुळे सरंगखेडा चेतक फेस्टिव्हलची देशभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली असून, आता हा बाजार राजस्थानच्या पुष्कर अश्व बाजारापेक्षाही अधिक प्रसिद्धी मिळवत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
