शरद पवार गटाचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चात सत्ताधाऱ्यांसह विरोधकही सहभागी होत आहेत. या मोर्चाद्वारे मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यातच आता संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची गुप्त भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील जुन्नर बाजार समितीत संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. गेल्या २० ते २५ मिनिटांपासून संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरु आहे. संदीप क्षीरसागर हे अचानक अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्या भेटीमागचे कारण काय, याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सत्यशील शेरकरांनीही घेतली अजित पवारांची भेट
संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जुन्नर विधानसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे नेते सत्यशील शेरकर यांनीही अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा मतदार संघातील प्रश्नाबाबत आज अजित पवार यांची भेट घेतली, असे सत्यशील शेरकर यांनी म्हटले.
संदीप क्षीरसागर यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी या भेटीमागचे कारण सांगितले. मी बीडचा पालकमंत्री आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी माझी भेट घेतली, असे अजित पवार म्हणाले.
बीडमध्ये पाणी प्रश्नाबद्दल भेट
यानंतर संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांबद्दल चर्चा केली. “अजित पवार हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी मी आज इथे आलो आहे. बीडमध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी मी आज अजित दादांसोबत चर्चा केली. ते पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे पालकत्व आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न मांडले” असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
धनंजय मुंडे नैतिकता पाळून राजीनामा दिलाच पाहिजे, संदीप क्षीरसागर यांची मागणी
“स्थानिक राजकारणात काय विषय आहेत, ते अजित दादा मार्गी लावतील. वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सरेंडर झाला, गुन्हा दाखल करायला उशीर झाला त्याच्यावर वरदहस्त कोण आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वाल्मिक कराडला संरक्षण हे देतात. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकता पाळून राजीनामा दिलाच पाहिजे”, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.