संताजी-धनाजी दिसायचे, तसे यांना एकनाथ शिंदे दिसतात, रामदास कदम यांनी जोरदार टीका
एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा सैनिक आहेत ते त्यांचा भगवा खांद्यावरुन खाली जाणार नाही.तुम्ही तुमच्या मालकाची काळजी करा, शिंदेंची काळजी करु नका असा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन त्यांचा पक्ष भाजपात विलीन करेन पण मला मुख्यमंत्री करा अशी आर्जवे अमित शाह यांना केल्याचा आरोप उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही निधड्या छातीचे शिवसैनिक आहोत, कडवे शिवसैनिक आहोत मरेपर्यंत आमच्या खांद्यावरचा भगवा झेंडा खाली जाणार नाही असा निर्धार रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम म्हणाले, तुमचा मालक बाटगा आहे ना, त्याची काळजी करा, शिवसेना – भाजप युती म्हणून निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस सोबत जाऊन झूकले, वाकले, काँग्रेसचे मंगळसूत्र आणि टीळा राष्ट्रवादी शरद पवारांचा लावला. भांडी घासायला गेले तिकडे तुमचा मालकांनी भ्याडपणा केला असा आरोप कदम यांनी यावेळी केला.
ही दाढी कडव्या शिवसैनिकाची
दाढी अफजलखानाची आहे, औरंगजेबाची आहे असे तुम्ही म्हणालात राऊतसाहेब मोगलांचे घोडे ज्यावेळेस पाणी प्यायला जायचे, त्यावेळी त्यांना पाण्यात संताजी -धनाजी दिसायचे तशी तुमची दैनी अवस्था झाली आहे असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदेच दिसतात. इतके तुम्ही घाबरले, शिंदेंनी घाम फोडलाय, ही दाढी कडव्या शिवसैनिकाची आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची दाढी आहे म्हणूनच त्यांनी तुम्हाला पाणी पाजलं आणि तुमचा टांगा पलटी केलाय असेही रामदास कदम यावेळी म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीत कळेल
अन्याय विरोधात लढण्यास बाळासाहेबांनी शिकवले आहे. अन्याय सहन करू नका असे सांगितले आहे. अन्यायाच्या विरोधात लढून तुमच्या बाटग्या मालकाला धडा शिकवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं.आता महाराष्ट्रात बदल घडणार असं तुम्ही म्हणाला ही गोष्ट खरी आहे की आता बदल होणार आहे. तुमच्या मालकाचे उद्धव ठाकरेचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे. या महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकीत कळेल हा सूर्य हा जयद्रथ. दूध का दूध.. पाणी का पाणी होऊन जाणार आहे असाही दावा रामदास कदम यांनी केला आहे.
तुम्ही तुमच्या मालकाची काळजी करा एकनाथ शिंदेंची काळजी करू नका. एकनाथ शिंदे कुठेही जाणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचे नाव संभाजी आहे ज्याच्या वडिलांचे नाव संभाजी आहे तो किती कडवा असेल याचा तुम्हाला ज्ञान नाही. मला खूप दुःख होते, राऊतसाहेब तुमच्यात इतका बदल कसा झाला असा उपरोधिक सवाल रामदास कदम यांनी शेवटी केला आहे.
