नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन आज केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडी पाहता या विषयावर आजच निकाल लागू शकतो, असा अंदाज बांधला जातोय. पण ते कितपत शक्य आहे याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली. त्यानंतर ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे लेखी उत्तर सादर करण्यात आलंय. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी सविस्तर भूमिका मांडण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंती या लेखी उत्तरात करण्यात आलीय.