Sanjay Raut : तुम्हाला युतीची फार चिंता आहे, राज आणि उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील – संजय राऊत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या अनेक महिन्यात एकत्र आले असून त्यांच्या युतीच्या घोषणेकडे जनसामान्यांपासून ते माध्यमं, राजकीय पक्ष अनेकाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरच भाष्य केलं आहे.

जुलै महिन्यात हिंदीच्या सक्तीवरून ठाकरे बंधू अनेक वर्षांनी प्रथमच एकत्र आले. त्यानंतर त्या दोघांच्याही मनोमिलनाची , युतीची जोरदार चर्चा सुरू झाली. कधी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी, तर कधी ठाकरे कुटुंबाने राज यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी लावलेली हजेरी.. या भेटी सदैव चर्चेत होत्या. आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याच्या चर्चा असतानाच दोन्ही भावांनी एकमेकांची राजकीय भेटही घेतली. तर दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांतील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदान गोंधळाविरोधात आवाज उठवला तेव्हाही राज-उद्धव सोबतच होते. मात्र असे असले तरीही दोन्ही बंधूंनी अद्याप तरी एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा केलेली नाही.
त्यांच्या युतीकडेच सर्वांचे लक्ष असून माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊत यांना याच मुद्यावरून आज पुन्हा प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा राऊत यांनी स्पष्ट, थेट उत्तर दिलं. तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिली आहे, राज ठाकरे व उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असे म्हणते, संजय राऊत यांनी याविषयी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
योग्य वेळी होणार घोषणा
मुंबईमध्ये ठाकऱ्यांचाच उत्सव होणार. मनसेकडून अनेक वर्षांपासून दिवाळीत दिपोत्सव होतोय, मी ही पाहिला आहे. प्रसन्न करणारा सोहळा आहे, आज त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण आहे, मीसुद्धा संध्याकाळी जाणार आहे. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीची सगळीकडे चर्चा आहे, पण त्याची अद्याप घोषणा होत नाहीये असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिली आहे. मा. उद्धव ठाकरे व मा. राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करत आहेत, एकत्र भूमिका मांडत आहे, एकत्र राजकारण करत आहेत महाराष्ट्राचं , पुढील पावलं जी पडणार आहेत, त्यासंदर्भात योग्य वेळी ते बोलतील असे राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस स्टार नाहीत, त्यांचा अपमान करू नका – राऊतांचा खोचक टोला
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बिहार दौऱ्यावरही निशाणा साधला. फडणवीस आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत, स्टार प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी कोपरखळी मारली. फडणवीस स्टार नव्हे, त्यांना सुपरस्टार प्रचारक केलं पाहिजे. ते स्टार नाहीत, त्यांचा अपमान करू नका. ते सुपरस्टार प्रचारक आहेत, बाकी सगळे स्टार असतील 1 स्टार, 2 स्टार, ते सुपरस्टार आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळे त्यांचा असा अपमान करणं बरोबर नाही. महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चालला आहे. जसे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात, इतर राज्याचे मुख्यमंत्रीहीलइथे येतात. भारतीय जनता पक्षात आता जन्मत:च स्टार निर्माण होतात असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
देशात कोणतंही बोगस कार्ड तयार करता येईल, राऊतांची टीका
महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्येही कोणाचंही बोगस कार्ड, आधार कार्ड निर्माण केलं जाऊ शकेल अशी यंत्रणा आहे. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या वेळी दावा केला होता की आता बोगस नोटा छापल्या जाणार नाहीत, म्हणून त्यांनी 2 हजारच्या नोटा रद्द केल्या. पण नोटबंदी पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात बोगस नोटा चलनामध्ये आल्या. त्यावर मोदींनी, अमित शहांनी काय केलं ? नोटबंदीमुळे दहशतवाद्यांचं कंबरडं मोडू असं म्हणाले, नोटबंदीमुळे काहीही झालं नाही, आजही मोठ्या प्रमाणात बोगस नोटांचा सुळसुळाट आहेच. त्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड हे बोगस छापले जातात, असं म्हणत राऊतांनी टीका केली.
