विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव तंत्र?, भास्कर जाधव म्हणाले, ही नौटंकी…
"ज्या माणसाने ४३ वर्षात अनेक पद उपभोगली, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तूस्थिती आहे. पण मी कोणतंही, कुठलंही पद मिळवण्यासाठी मी हे सर्व करणं हे कधीही केले नाही आणि करणार नाही", असे भास्कर जाधव म्हणाले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते राजन साळवी यांनी नुकतंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर आता आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काल भास्कर जाधव यांनी मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असे विधान केले होते. आता यावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी माझ्या गेल्या ४३ वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही”, असे भास्कर जाधव म्हणाले.
“मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, असे विधान मी केले होते. शिवसेनेनं मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली, असे दाखवलं जात आहे. मी नम्रपणे सांगतो की मी जर असा शब्दप्रयोग केला असेल तर तुम्ही जरुर प्रसारित करा. मी माझ्या गेल्या ४३ वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. हे केवळ माझ्याच वाटेला आलं असं नाही, असा भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं. हे माझं दुर्देव आहे. हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला, हा पहिला खुलासा आहे”, असे भास्कर जाधव म्हणाले.
“आपले सहकारी आपल्यासोबत राहायला हवेत”
“सर्वसाधारणपणे जातोय त्याला जा, जायचं असेल तर जा, हा विचार माझा नाही. हा विचार मी मांडत असताना आपले सहकारी आपल्यासोबत राहायला हवेत याकरिता आपण प्रयत्न केले पाहिजेत ही भूमिका मी मांडली. पक्षप्रमुखांनी जरुर हे विधान करावे, तो त्यांचा हक्क, अधिकार आहे. त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात तरीदेखील तुम्ही सोडून जात असेल आणि समजावूनही ती व्यक्त समजत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे, असं मी समर्थन केले. पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं, हे योग्य नाही. हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही बोलत आहे”, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे
“महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की कोणालाही कोणाची गरज राहिलेली नाही. जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करु. शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. पण ते असतानाही कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा, नावाचा आणि निशाणीचा वारसदार नेमला. त्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात न्याय मागतोय. पण आम्हाला न्याय मिळत नाही”, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.
मी कधीही नाटक केले नाही
“गेल्या 43 वर्षांच्या राजकीय जीवनात कोणतंही पद मिळवण्यासाठी मी कधीही नौटंकी केली नाही. मी कधीही नाटक केले नाही. मी रडत बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबाने, नाही मिळालं तर माझ्या नशिबाने. मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हे करतोय, मी कोणाकडे तरी जाणार असा जो काही दबाव निर्माण करतोय, मी माझ्या आयुष्यात अशी नौटंकी केली नाही. असा नाटकीपणा मी कधीही केला नाही. माझी राजकारणातील किती वर्ष राहिली, जे मी त्या काळात केलं नाही, तर आता का करेन? ज्या माणसाने ४३ वर्षात अनेक पद उपभोगली, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तूस्थिती आहे. पण मी कोणतंही, कुठलंही पद मिळवण्यासाठी मी हे सर्व करणं हे कधीही केले नाही आणि करणार नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे”, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.