Solapur News: ये दोस्ती हम नही…मित्राच्या मृत्यूचा धक्का, अंत्यसंस्कार सुरु असतानाच जिगरी दोस्ताचा गळफास, घटनेनं सोलापूर हादरलं
Solapur Crime News: एका मित्राने जीवन संपवल्यानंतर त्याच्या विरहात जिगरी मित्राने टोकाचे पाऊल उचलल्याने सोलापूर हादरले. दक्षिण सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.

Gorakh Bhoi and Suresh Bhoi: सोलापुरात मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दक्षिण सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे. गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावे आहेत. या घटनेने गावातील तरुण हादरले आहेत.
गोरखच्या आत्महत्येचा मनावर परिणाम
गोरख भोई आणि सुरेश भोई हे दोन्ही तरुण एकमेकांचे जिवलग मित्र होते. एकमेकांच्या सुख-दुःखात ते सहभागी असत. दोघांची परिस्थिती बेताचीच होती. दोघेही गावात एकत्र दिसायचे. दुसऱ्या गावाला सोबत जायचे. त्यांच्या मैत्रीचे गावकऱ्यांना कौतुक होते. हे दोघेही जिवलग मित्र होते. पण गोरख भोईच्या आत्महत्येने सुरेश भोईच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्याला मित्राचा हा विरह सहन झाला नाही. त्याने ही लागलीच आत्महत्या केली. त्यामुळे गावात नातेवाईकांच्या किंकाळ्यांनी अनेकांच्या काळजाला कापरं भरलं. या घटनेने गावकरी सुन्न झाले.
मित्राच्या अंत्यसंस्काराला हजर आणि..
आधी गोरख भोई यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावावर शोककळा पसरली. ही वार्ता सुरेशला समजली. त्याने गोरखचे घर गाठलं. जिवलग मित्राने असं टोकाचं पाऊल का उचललं या विचारात तो होता. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण सुरेशचे मन गलबलून गेले. जिवलग मित्र सोडून गेल्याने त्याची घालमेल सुरु झाली. गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेश भोई यानेही आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
सुरेश भोई हा शेतात गेला आणि त्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे गावकरी हादरले. एकाच दिवशी दोन मित्रांच्या अंत्ययात्रा या गावातून निघाल्या. दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुरेश भोई याचे आई-वडील शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. याप्रकरणी दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटनेची नोंद करण्यात आली आहे.
