मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक मोठी जबाबदारी, पार्थ-जय पवार मुंबईकडे रवाना
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. या पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. अशातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्रीपदासह सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक जबाबदारी
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली होती, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. त्या सोबतच अजित पवारांकडे असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार आपल्याकडेच ठेवणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता त्या अजित पवारांप्रमाणे दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत.
उद्या मुंबईत आमदारांची बैठक
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी दुपाती दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून विधीमंडळास पत्र पाठवण्यात आलं आहे. उद्या आमदारांच्या बैठकीस जागा द्यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे, उद्या विधानभवनात ही बैठक होणार आहे. यासाठी पक्षाचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत.
कुठलाही निर्णय घ्यायचा असेल त्याला आमचा पाठींबा – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यावर बोलताना म्हटले की, ‘अजितदादांचे कुटुंब असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्यांना आमचे समर्थन असेल. राष्ट्रवादीच्या निर्णयाला भाजपा पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठींबा असेल, राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी दोन वेळा ते चर्चा करुन ते गेले आहेत. या चर्चेत त्यांनी त्यांची काय कार्य पद्धती आहे ? काय-काय ऑप्शन्स आहेत ? यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे. मात्र, अंतिम निर्णय जो काही असेल त्याचा निर्णय तो पक्ष घेईल या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही.’
