ठाण्यात पाणीबाजी, 4 दिवस पाणी कपात; तुमच्या भागात कधी येणार पाणी?
ठाणे शहरात मुख्य जलवाहिनी बिघडल्याने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील लाखो नागरिकांवर परिणाम होणार आहे. प्रिस्ट्रेस कॉंक्रिट जलवाहिनीची दुरुस्ती क्लिष्ट व वेळखाऊ असल्याने ही कपात आवश्यक आहे.

ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ठाणे शहरात लागू करण्यात आलेली ५० टक्के पाणी कपात आणखी चार दिवस म्हणजेच १५ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, आणि दिवा येथील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा, असे कळकळीचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.
नेमका बिघाड काय?
ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या पिसे बंधारा येथून पाणी टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे आणले जाते. मात्र कल्याण फाटा येथे महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान १००० मि.मि. व्यासाची मुख्य जलवाहिनी दुसऱ्यांदा नादुरुस्त झाली. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती सुरू केली असली तरी ही जलवाहिनी जुनी असण्यासोबतच प्रिस्ट्रेस काँक्रिट (Prestressed Concrete – PCCP) पद्धतीची आहे. पीसीसीपी जलवाहिनीची दुरुस्ती क्लिष्ट आणि वेळखाऊ असते. कारण दुरुस्तीसाठी विशेष पद्धती आणि वेळ आवश्यक असतो. याच कारणामुळे दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. ही दुरुस्ती संपेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के घट राहील.
अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना
पाणीटंचाईच्या काळात शहरात पाण्याचे समान वाटप राखण्यासाठी महापालिकेने खालीलप्रमाणे झोन आणि वेळेचे व्यवस्थापन केले आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत पाणी वितरणाचे झोनिंग करून प्रत्येक भागाला दिवसातून १२ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या १२ तासांच्या नियोजनामुळे पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होईल. शहरातील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागेल.
ठाण्यातील या गंभीर पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही रस्त्यावर उतरले आहेत. ज्यामुळे ठाणे महापालिकेवर दबाव वाढत आहे. भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी याच पाणी कपातीवरून कळवा शहरात आंदोलन छेडले. आपल्याच महापालिकेच्या आणि सत्तेतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत त्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. तर विरोधी पक्षांनी ठाणे शहर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रमुख भागांमध्ये तीव्र निदर्शने केली. त्यांनी पाणी व्यवस्थापनातील महापालिकेचे अपयश आणि नागरिकांना होणारा त्रास अधोरेखित केला.
