मोठी बातमी! तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा, संभाजीराजेंच्या पक्षाकडून कुणाकुणाला संधी?
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकारणाला कंटाळलेल्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मतदारांपुढे नवा पर्याय निर्माण व्हावा या हेतूने राज्यातील काही छोट्या पक्षांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. या तिसऱ्या आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची देखील उमेदवारी या यादीतून जाहीर करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट समोरासमोर आणि चुरशीची लढत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकारणाला कंटाळलेल्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मतदारांपुढे नवा पर्याय निर्माण व्हावा या हेतूने राज्यातील काही छोट्या पक्षांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे.
छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे या तिसऱ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. तसेच आमदार बच्चू कडू हे देखील या आघाडीचे प्रखुम नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याचा आपला हेतू आहे, अशी भूमिका या तिसऱ्या आघाडीची आहे. त्यामुळे या आघाडीने आपल्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती असं ठेवलं आहे. या आघाडीने आता उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.
तिसऱ्या आघाडीत प्रहारकडून 4 उमेदवारांची घोषणा
तिसऱ्या आघाडीच्या पहिल्या यादीत पहिलंच नाव हे आमदार बच्चू कडू यांचं आहे. बच्चू कडू यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनिल छबिलदास चौधरी यांना रावेर यावल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच प्रहारकडून चांदवडमधून गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रहारकडून आमदार सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकूण 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
संभाजीराजेंच्या पक्षाकडून कोण-कोण उमेदवार
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ऐरोली येथून अंकुश कदम आणि हदगाव हिमायतनगर येथून माधव देवसरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य समितीकडून हिंगोली मतदारसंघातून गोविंदराव भवर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच स्वतंत्र भारत पक्षाकडून राजुरा येथून वामन चटप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी शिरोळ आणि मिरज या दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. पण यादीत तिथल्या उमेदवारांची नावे देण्यात आलेली नाहीत. कदाचित आगामी काळात स्वाभिमानीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.