राणी बागेतील ‘रुद्र’ नावाचा वाघ बेपत्ता, सत्ताधारी नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता आणखी एका वाघाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या संदर्भात सात दिवसांत भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकताच भायखळ्याच्या या प्रसिद्ध प्राणीसंग्रहालयात शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता आणखी एक रुद्र नावाचा वाघ बेपत्ता असल्याची खळबळजनक बातमी आली आहे. या रुद्र वाघाबद्दल भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनीच राणी बागेच्या संचालकांना पत्र लिहून सवाल केले आहेत.
मुंबईतील भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील शक्ती नावाच्या वाघाचा अलिकडेच संशयास्पद मृ्त्यू झाला होता. प्राणी संग्रहालयातील प्रशासन यामुळे संशयाच्या घेऱ्यात आहे.या बागेतील पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळीच वाघावर उपचार न झाल्याने शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.आता आणखी एक रुद्र नावाचा वाघ बेपत्ता झाल्याचा दावा भाजपाचे नितीन बनकर यांनी पत्र लिहून करत चौकशीची मागणी केली आहे.
शक्ती वाघाबाबत दिशाभूल ?
शक्ती वाघाच्या संशयास्पद मृ्त्यूनंतर आता रुद्र वाघ गायब झाल्याचा आरोप नितीन बनकर यांनी पत्र लिहून केला आहे. रुद्र वाघ कसा गायब झाला असा सवाल करत जर सात दिवसात या प्राणी संग्रहालयाने वस्तूस्थिती समोर आणली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही नितीन बनकर यांनी या पत्राद्वारे केला आहे. प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे राणीच्या बागेत शक्ती वाघाचा मृत्यू न्यूमोनियाच्या संसर्गामुळे झाला. परंतू आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या वाघाचा मृत्यू श्वसन नलिकडेत हाड अडकल्याने गुदमरुन झालेला आहे.
रुद्र नावाचा वाघ कुठे आहे ?
तसेच शक्ती वाघाचा मृत्यू दि. १७ नोव्हेंबरला झाला असताना त्याचे अधिकृत निवेदन २६ नोव्हेंबर इतक्या उशीरा का जारी करण्यात आले. त्यामुळे वन्य प्राण्याच्या मृत्यूची घटना इतका वेळ दडवून ठेवण्याचे कारण काय असा सवाल या पत्रात बनकर यांनी केला आहे. पुढे ते म्हणतात की प्राणी संग्रहालयात सध्या जय ( वय ३ ) आणि करिष्मा ( वय ११ आणि ६ महिने ) हे दोन वाघ असल्याचे प्रशासन म्हणजे. परंतू माझ्या माहितीनुसार प्राणीसंग्रहालयात शक्ती, जय, करिष्मा आणि रुद्र असे एकूण चार वाघ प्रदर्शनासाठी अस्तित्वात होते. शक्तीचा मृत्यू झाला तर जय आणि करिष्मा आहेत. मग रुद्र नावाचा वाघ कुठे गेला आहे ? अशीही विचारला बनकर यांनी त्यांच्या पत्रात केली आहे.
रुद्र वाघाबाबत काही गंभीर घडले का ? अशी शंका उपस्थित होत आहे ? या संदर्भात प्रशासनाने तातडीने खुलासा न केल्यास आंदोलन करण्यात येईल असेही या पत्रात नितीन बनकर यांनी म्हटले आहे.
