महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट काढणार; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा, एकाचवेळी 50 ग्रंथांचे प्रकाशन

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट, नाटक साकारणार, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट काढणार; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा, एकाचवेळी 50 ग्रंथांचे प्रकाशन
पालकमंत्री छगन भुजबळ, राजमाता शुभांगीनींराजे गायकवाड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील ग्रंथांचे प्रकाशन केले.

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट, नाटक काढणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. महाराजा सयाजीरावांनी महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर अशा अनेक युगपुरुषांना मदत केली. माणसांमधील कर्तृत्व ओळखून त्याला चाल देणारा हा राजा होता. त्यांचे चरित्र जगासमोर येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी महाराजांवरील 50 पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. त्यात महाराज सयाजीराव लेखन आणि सुप्रशासन 11 ग्रंथ, सयाजीरावांसबंधी स्वंतत्र लेखन व जगप्रवास 16 ग्रंथ, मराठी, इंग्रजी चरित्र ग्रंथ शिक्षण अहवाल, स्त्री शिक्षण 13 ग्रंथ, हिंदी ग्रंथ प्रकाशन भाषण, पत्र संग्रह, गौरवगाथ 10 ग्रंथांचा समावेश आहे.

मान्यवरांची उपस्थिती

कुसुमाग्रजनगरीतील साहित्य संमेलनात हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाला महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोद्याच्या कुलपती राजमाता शुभांगीनींराजे गायकवाड , दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत, समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, माजी आमदार पंकज भुजबळ, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे समन्वय प्रा. हरी नरके, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विश्वास ठाकूर उपस्थित होते.

फुलेंना महात्मा पदवी दिली

कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज महाराज सयाजीराव गायकवाडांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे, ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बा‍ब आहे. समितीने 50 पुस्तकांचे प्रकाशन करुन षटकार मारला आहे. तसेच महाराज सयाजीराव गायकवाडांचे जन्मस्थळ नाशिक असून, आज त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन जन्मभूमीत व मराठी साहित्य संमेलनात होत असल्याने आजचा दिवस भाग्याचा असल्याचे सांगत भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करुन महात्मा फुलेंचे सर्व विचार राज्यकर्ता म्हणून अमलांत आणणारा पहिला राजा होता. तसेच लेखणी लिहिणाऱ्याच्या विचारसरणीवर अवलंबून असून पूर्वी बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात नव्हता. आता बहुजन समाज शिकला असून ते ही आता आपल्या बहुजन समाजाचे साहित्य संपदा जगासमोर आणून ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

संपूर्ण साहित्य लोकांसमोर आणणार

महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने महाराजा सयाजीराव गायकवाडांचे संपूर्ण साहित्य संपदा लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी ग्वाही यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे पहिले राजे होते. यशवंतराव चव्हाण यांनी 1962 साली महाराजा सयाजीराव गायकवाड या दूरदशी राजाचे समग्र साहित्य महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता, पण यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला केंद्रीय संरक्षण मंत्री जावे लागले असल्याने राजाचे समग्र चरित्र साहित्य प्रकाशन प्रकल्प तिथेच थांबला. पंरतु आता शक्य तितके महाराजा सयाजीराव गायकवाडांचे साहित्य संपदा शासनमार्फत प्रकशित करण्यात येणार असल्याचे श्री. उदय सामंत यांनी सांगितले.

महाराजांचे कार्य दिशादर्शक

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजमाता शुभांगींनीराजे म्हणाल्या, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभार चालविताना समाजातील सर्व घटकांचा विचार केला. त्यामुळे महाराजांचे कार्य आजही समाजातील सर्व घटकांना दिशादर्शक आहे. तसेच आज महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मभूमीत त्यांच्या 50 पुस्तकांचे प्रकाशन होत आहे असल्याने अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांची साहित्य संपदा व कार्य राज्य शासनामार्फत लोकांसमोर नेण्यासाठी प्रयत्न केला जात असून, अशाप्रकारे महाराजा सयाजीराव गायकवाडांची राष्ट्रीय पातळीवर ओळख होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही राजमाता शुभांगींनीराजे यांनी व्यक्त केली.

इतर बातम्याः

नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा साहित्य संमेलनात गौरव

Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य

Jawed Akhtar Speech | जे युरोपात नव्हतं, देशातही नव्हतं ते महाराष्ट्रात, जावेद अख्तरांनी मराठी जनांना ‘गर्वा’चं घर दाखवलं…!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI