Maharashtra News Live : मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे हे लक्षात ठेवा – अखिल चित्रे
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
तपोवनमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांकडून प्रोग्राम
तपोवनमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांकडून पर्यावरणावर संगीतमय सहभाग प्रोग्राम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे यासारख्या विविध अभंग गायन करत वृक्षतोडीचा निषेध. नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या माध्यमातून आज तपोवनमध्ये वृक्ष वाचविण्याच्या समर्थनार्थ गायनाचा कार्यक्रम.
-
मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे हे लक्षात ठेवा – अखिल चित्रे
“शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात” हा आरोप सरळसरळ खोटा आहे.आमचे खासदार,आमदार,नगरसेवक प्रत्येक मुंबईकराची सेवा करतात, धर्म-जात न पाहता. आणि हो,विलेपार्ल्यातला जैनालय नेमक कुणामुळे वाचला?तो तोडला जात होता तेव्हा कुणाचं सरकार होतं, याचाही जरा मागोवा घ्या” असं ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे म्हणाले.
-
-
नाशिक मध्ये थंडी वाढली पारा 4 अंश खाली
नाशिक मध्ये थंडी वाढली पारा 4 अंश खाली पोहोचला आहे. शहरात कमाल तापमानात मोठी घसरण 22 वरून थेट 27 वर पोहोचली आहे. पुढील 2 दिवस थंडीत वाढ होणार असून त्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. शहरात किमान तापमान हे 11.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 27.2 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. सकाळी आणि सायंकाळी थंडी असते, दिवसभर वातावरण नियमित होतं. आता मात्र पुढील 2 दिवस थंडीत वाढ होणार आहे.
-
ठाणे जिल्ह्यात 24 हजार 121 संशयित रुग्णाची तपासणी, 223 नवे कुष्ठरुग्ण
ठाणे जिल्ह्यात 24 हजार 121 संशयित रुग्णाची तपासणी केली असता त्यामध्ये 223 नवे कुष्ठरुग्ण आढळले आहेत. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. नव्या रुग्णांची होणारी नोंद चिंताजनक असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. नवे कुष्ठरोग असलेले रुग्ण आढळून आलेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
-
ठाण्यात 500 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प महापालिका स्वतः उभारणार
ठाण्यात 500 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प महापालिका स्वतः उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे महापालिकेने शहरातील वाढत्या ओल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भिवंडीतील आतकोली परिसरात 500 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प स्वतः उभारण्याचा निर्णय घेतला आहे.. 1200 मॅट्रिक टन कचरा शहरातून दररोज तयार होतो..
-
-
ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्ये महिलेवर दोघांचा सामूहिक अत्याचार
केकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॅमिली कोर्टाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली…
-
जालन्यात पाचट पेटवल्याने १५ एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारात शेजारील शेतकऱ्याने उसाचे पाचट पेटवल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत परिसरातील पाच शेतकऱ्यांचा मिळून तब्बल १५ एकर ऊस जळून खाक झाला असून, यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंडित केशवराव जिगे (२.५ एकर), बद्री जिगे (३ एकर), दिपक जिगे (४ एकर) आणि कैलास जिगे (५ एकर) यांचा ऊस व शेतातील पाईप्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली, मात्र या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
-
नागपुरात सर्वत्र होर्डिंग्स, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत
नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात होर्डिंग्स लावण्यता आले आहेत. या अधिवेशनासाठी आजपासूनच नेत्यांचे नागपुरात आगमन सुरू झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र मोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे हे होर्डिंग लक्ष वेधून घेत आहेत, ज्यामुळे नागपूरमध्ये राजकीय उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
-
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला, थंडीचा कडाका वाढला
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून, आज तापमान 7.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे आता रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
-
जालना पालिका आक्रमक, १०२ कोटींच्या वसुलीसाठी ३१ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांना नोटीस
जालना शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीकडे मालमत्ता धारक दुर्लक्ष करत असल्याने पालिका प्रशासन आता आक्रमक झाले आहे. मागील काही दिवसांपासून कर वसुलीत अपयशी ठरलेल्या प्रशासनाने थकबाकी वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. सुमारे ३१ हजार ४६३ मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील नागरिकांकडे तब्बल १०२ कोटी रुपयांची पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने न भरल्यास नोटीस देऊन मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा थेट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे ३ वर्षीय बालकाचा गळा कापला
छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे जीवघेणा अपघात झाल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा सेंट्रल नाका परिसरात समोर आली आहे. आई-वडिलांसोबत दुचाकीवरून निघालेल्या स्वरांश संजीव जाधव या तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्याला मांजा अडकला आणि गंभीर रक्तस्राव सुरू झाला. वडिलांनी तातडीने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी, स्वरांशच्या गळ्यावर खोल जखम झाली. त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तातडीने शस्त्रक्रिया करून २० पेक्षा जास्त टाके देण्यात आले असून सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नायलॉन मांजावर बंदी असूनही शहरात सर्रास त्याचा वापर होत असल्याने निष्पाप जीवांना धोका निर्माण झाला आहे; या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
-
नाशिक तपोवन वृक्षतोड आंदोलन, प्रशासन-आंदोलक उद्या चर्चा करणार
नाशिकच्या तपोवन परिसरातील झाड तोडण्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर उद्या सोमवार दिनांक ८ डिसेंबरला तोडगा निघण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने अधिकारी उद्या आंदोलकांशी चर्चेसाठी निमंत्रण देऊन संवाद साधणार आहेत. तपोवन येथे साधूग्राम तयार करण्यासाठी काही झाडे काढावी लागतील, या प्रशासनाच्या भूमिकेमुळे हे आंदोलन सुरू झाले होते. विशेष म्हणजे याच भागात होणाऱ्या वादग्रस्त एक्झिबिशन सेंटर प्रकल्पाला आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उद्याच्या चर्चेनंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
-
विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत, जळगाव हादरले
जळगावच्या मास्टर कॉलनीमध्ये विजेच्या धक्क्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घराशेजारून गेलेल्या विजेच्या तारांना पाईप साफ करण्याच्या लोखंडी सळईचा धक्का लागून ही दुर्घटना घडली होती. या घटनेत फातेमा अजिम पठाण (१०) ही गंभीर जखमी झाली होती, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या वडिलांसह आणखी एका मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेच्या २६ तासांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता, फातेमा हिचाही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एकाच घटनेत कुटुंबातील तिघांना गमवावे लागल्याने मास्टर कॉलनीवर शोककळा पसरली आहे.
-
गंगापूर रोडवर भीषण अपघात, भरधाव बसने दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर रोडवर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव बसने रस्ता ओलंडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एका ५६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना वैजापूर तालुक्यातील क्रांती फिटनेस क्लबजवळ घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून भगवान माणिकराव सुलताने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.धडकेनंतर सुलताने गंभीर जखमी झाले होते. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुलताने हे सावखेड गंगा येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
-
नागपूर अधिवेशनाला विमानाचा फटका, अधिवेशनाला पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय
नागपूरमध्ये उद्यापासून (सोमवार ८ डिसेंबर) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर इंडिगो (Indigo) विमानाच्या गोंधळाचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर मार्गावरील उड्डाणे वारंवार रद्द होत असल्याने आता मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांचेही नियोजन कोलमडले आहे. अनेक मंत्री आणि आमदारांना अधिवेशनासाठी आज नागपुरात दाखल होणे आवश्यक असताना ऐनवेळी विमाने रद्द झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. या गोंधळामुळे अनेक लोकप्रतिनिधी आता विमान प्रवासाचा पर्याय सोडून समृद्धी महामार्गाचा वापर करून अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नागपुरात पोहोचताना दिसत आहेत.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारी ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. 8 डिसेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत एक आठवडा अधिवेशनाचे कामकाज असणार आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनापूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासोबतच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. विरोधक नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र होर्डिंग्स लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लागले आहेत. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असले तरी आजपासूनच नेते नागपुरात येत आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Dec 07,2025 9:08 AM
