Uddhav, Raj Thackeray Mumbai morcha LIVE : सांगली – शिक्षकांच्या सोसायटी सभेत गोंधळ आणि धक्काबुकीची परंपरा यंदाही कायम
दिल्लीत Gen-Z चं मोठं यश मिळालं. विद्यार्थी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकलं. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवाजी पार्कात उद्धव-राज ठाकरेंनी अभिनंदन मोर्चाचं आयोजन केलं आहे.

नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 12 वर्षांनंतर पहिल्यांदा PM मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांला राजीनामा द्यावा लागला. तसेच केंद्र सरकारने तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलकांनी जंतरमंतर सोडलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलनाचं विरोधी पक्षानेही कौतुक केलं. दिल्लीत यशस्वी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दादरच्या शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मोर्चाचे आयोजन केलं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यासहित देशासहित राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगलीमध्ये शिक्षक सोसायटी सभेत गोंधळ
सांगलीमध्ये शिक्षकांच्या पार पडलेल्या सभेत धक्काबुक्की आणि गोंधळ याची परंपरा यंदाही कायम असल्याचं पाहायला मिळालं.शिक्षकांच्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली,या सभेमध्ये नेहमीप्रमाणे शिक्षकांचा गोंधळ आणि एकमेकांवरच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला
-
मुंबईतील भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग
मुंबईतील भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती
आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट, परिसरात खळबळ
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
१ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
पहिल्या मजल्यावरील काही कागदपत्रे आणि इतर साहित्यचे नुकसान
-
-
सोलापूर हादरलं, आई अन् मुलीची रेल्वेखाली उडी
सोलापूरच्या सुशील नगर परिसरातील आई-मुलीची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
३३ वर्षीय वर्षा आधटराव व १४ वर्षीय स्वरा आधटराव असं आई आणि मुलीचं नाव
रविवारी पहाटे विजापूर रोड परिसरात घडली हृदयद्रावक घटना
घटनेमुळे सुशील नगर परिसरात शोककळा
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा
दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
-
सोलापूरात मायलेकीने स्वत:ला रेल्वेखाली झोकून देऊन जीवन संपवले
सोलापूरातील सुशील नगर परिसरातील माय-लेकीने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ३३ वर्षीय वर्षा आधटराव आणि १४ वर्षीय स्वरा आधटराव यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे विजापूर रोड परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे सुशील नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
-
सांगली – शिक्षकांच्या सोसायटी सभेत गोंधळ आणि धक्काबुकीची परंपरा यंदाही कायम
सांगलीमध्ये शिक्षकांच्या पार पडलेल्या सभेत धक्काबुक्की आणि गोंधळ याची परंपरा यंदाही कायम असल्याचं पाहायला मिळाले आहे. शिक्षकांच्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये नेहमीप्रमाणे शिक्षकांनी गोंधळ आणि एकमेकांवरच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला आहे.
-
-
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे पदाधिकारी खेवरे नाना याचा शिवसेनेत प्रवेश
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे पदाधिकारी खेवरे नाना यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की या विकास कामाबरोबर संघटनेचं काम मजबूत करूया. केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल तो दिला जाईल. खेवरे नानांचा मानसन्मान शिवसेनेत राखला जाईल, तुमच्या मनातलं जे आहे ते राखलं जाईल. जुनं नवं कुठेही आपले मतभेद राहता कामा नये असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
-
पक्षाची धोरणे जनहिताच्या विरोधात, भाजपा नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
जळगावच्या अमळनेर येथील भाजप शहराध्यक्ष आणि नगरपरिषदचे माजी सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाची धोरणे जनतेच्या विरोधात आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने व्यथित झाल्याने आपण राजीनामा देत असल्याचे श्याम जयवंतराव पाटील यांनी म्हटले आहे.
-
सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केले जाणार
प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्याच्या उद्देशाने आणलेले सार्वजनिक परीक्षा (सुधारणा) विधेयक उद्या लोकसभेत सादर केले जाईल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे विधेयक सादर करतील. या नवीन विधेयकात पूर्वीपेक्षा अधिक कठोर शिक्षेची तरतूद आहे.
-
अमरनाथ यात्रेच्या ताफ्यातील वाहनात बिघाड, यात्रेकरू सुरक्षित
अमरनाथ यात्रेच्या ताफ्यातील एका वाहनात बिघाड झाल्याने त्यातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. सर्व यात्रेकरू सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. ताफ्यातील पर्यायी वाहनाच्या सायलेंसरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चामलवास मुख्य ठिकाणी बंद पडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक यंत्राचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
-
होर्मुझमध्ये सागरी सुरुंगांना धडकल्यानंतर तेलवाहू जहाजाचा स्फोट
इराणच्या वृत्तसंस्थेने एक गंभीर दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये समुद्राच्या तळाला धडकल्यानंतर एका तेलवाहू जहाजाचा स्फोट झाला आहे.
-
बारामतीच्या सुपे-चौफुला मार्गावर मालवाहू ट्रक-दुचाकीचा अपघात
बारामतीच्या सुपे चौफुला मार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा अपघात घडला आहे. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे.
-
भारताचं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 192 धावा केल्या. तसेच विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. आता भारतीय संघ झिम्बाब्वेला किती धावांवर रोखते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
अनाहत सिंहने सुवर्णपदक जिंकल्याचा अभिमान वाटतो: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केले, “2026 च्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी. अनाहत सिंहचा अभिमान वाटतो, ज्याने सुवर्णपदक जिंकून जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय स्क्वॅश खेळाडू होण्याचा मान मिळवला. या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॅशची लोकप्रियता आणखी वाढेल.”
-
शहापूर -डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस
ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे डोळखांब बाजारपेठ मध्ये पाणी शिरले आहे. यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे फळ विक्रेते तसेच छोट्या-मोठ्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
सोलापूर : करमाळ्यात 27 वा ‘कारगिल विजय दिवस’ उत्साहात साजरा
कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला उजाळा देण्यासाठी करमाळा येथे २७ वा कारगिल विजय दिवस’ अत्यंत देशभक्तीपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. देश रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आणि आजी-माजी सैनिकांचा विशेष सत्कार करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
-
मी निवडणूक लढवणार नाही, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा मोठा निर्णय
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. या संदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘आज राजकारण हे पूर्णपणे भ्रष्ट झालं आहे. त्यामुळे मी आता मोठा निर्णय घेतला आहे, मी 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये, मी राजकारणात सक्रिय राहील परंतु ते फक्त जनतेसाठी लोकांची काम करण्यासाठी असं सिद्धारमैया यांनी म्हटलं आहे.
-
अकोल्यात अल्पवयीन पीडितेच्या मृत्यूनंतर संताप; मृतदेहासह रास्ता रोको
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. अत्याचारप्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पीडितेच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मृतदेहासह अकोला नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
-
शेतकऱ्यांचे विजेसाठी आमरण उपोषण सुरू
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे आठ शेतकऱ्यांचे विजेसाठी आमरण उपोषण सुरू आहे. उजनी काठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांचा शेतीचा नियमित आठ तास वीज पुरवठा सोडण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांच्या इशारा
-
सिंधुदुर्गमधील आंबोली धबधब्यावरती मोठी गर्दी
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथे आज सकाळपासून पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. रविवार सुटीचा दिवस असल्याने आंबोलीत कोल्हापूर, गोवा, कर्नाटकासह पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. मुख्य आकर्षण असलेला आंबोली घाटातील धबधब्यांचे हे रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी वीकेंडला आंबोलीत पर्यटकांचा महापूर आलेला पाहायला मिळतोय. सुटी असल्याने हजारो निसर्गप्रेमींनी आंबोलीकडे धाव घेतलीय.पांढऱ्याशुभ्र धुक्याची चादर आणि अंगावर येणारे पाण्याचे तुषार झेलत पर्यटकांनी मुख्य धबधब्यावर जलक्रीडाचा मनसोक्त आनंद घेतला.
-
गुजरातवर पुराचं संकट, सुरत-नवसारीमध्ये पाणीच पाणी
गुजरातवर पुराचं संकट आले आहे. सुरत, नवसारीत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. भारतीय तटरक्षक दलाचे ऑपरेशन जलराहत सुरु आहे. या अंतर्गत जवळपास 170 जणांचा जीव वाचवण्यात आला आहे.
-
तीन हात नाका वाहतूक कोंडी मुक्त होणार- एकनाथ शिंदे
भूमी पूजनासाठी आम्ही काम थांबवले नाही. पेपरमध्ये येणार नंतर काम करू असे आम्ही केले नाही. वेळेत प्रकल्प पूर्ण करू. तीन हात नाका येथे अनेक भूगर्भात अनेक लाईन आहेत. त्यामुळे एशियामध्ये सर्वात जास्त वेळ या तीन हात नाका ठिकाणी थांबावे लागते. ते आता वाहतूक कोंडी मुक्त होणार..15 सेकंद लागणार..u loop प्रकल्प सर्व वाहने ब्रीज वरून जाणार आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
अमरनाथ यात्रा 6 दिवसांनी पुन्हा सुरु
अमरनाथ यात्रा 6 दिवसांनी पुन्हा सुरु. 6 हजारांहून अधिक भाविक जम्मू-काश्मीरकडे रवाना. खराब हवामानामुळे 19 जुलैपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती.
-
नवीन पिढीमध्ये असलेल्या भावना आणि सन्मान मोदी करत आहेत- सुनील तटकरे
शेवटी कोणी कोणत्या विषयावरती काय भावना व्यक्त कराव्यात…. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वांना अधिकार आहे….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवस विद्यार्थी संवाद केला…चर्चा करण्यासाठी निरोप पाठवले… नवीन पिढीमध्ये असलेल्या भावना आणि सन्मान मोदी करत आहे…लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय झाला आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
-
भंडाऱ्याच्या खडकी गावाजवळ भीषण अपघातात 19 जण जखमी
भंडाऱ्याच्या खडकी गावाजवळ भीषण अपघातात 19 जण जखमी. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक, सुदैवानं जीवितहानी टळली, वाहन चालकाने जखमी महिलांना अपघातस्थळावरून पायी प्रवास करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.
-
जळगावच्या नशिराबादमधील पोलीस आणि तरूणाचा वाद
जळगावच्या नशिराबादमधील पोलीस आणि तरूणाचा वाद. मद्यधुंद तरूणाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडली. पोलीस आणि तरूणाच्या वादाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल. पोलिसांनी मारहाण केल्याचा तरूणाचा आरोप. याप्रकरणात अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याची माहिती
-
आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव
आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव. कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले, तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. कोरोनाच्या शिरकावानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन
-
दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात आंदोलन संपल्यानंतर शुकशुकाट
दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात आंदोलन संपल्यानंतर शुकशुकाट. जंतरमंतर परिसरातील आंदोलन संपल्यानंतर रात्रीपासून इंटरनेट सेवा सुरळीत. दिल्ली मेट्रो सेवा पूर्ववत, आंदोलनादरम्यान 18 मेट्रो स्थानक बंद होती. आंदोलनावेळी जंतरमंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद होती. आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर रात्रीपासून इंटरनेट सेवा सुरळीत
-
मनोज जरांगे पाटील यांनी 29 जुलै रोजी बोलावली बैठक
मनोज जरांगे पाटील यांनी 29 जुलै रोजी अंतरवाली सराटी येथे बोलावली मराठा समाज बांधवांची बैठक
जरांगे पाटील यांच्या टीमकडून राज्यभरातील मराठा बांधवांना बैठकीसाठी देण्यात आला निरोप
29 जुलैच्या बैठकीत जरांगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता
अंतरवाली सराटी येथे सकाळी 11 वाजता बैठकीला होणार सुरुवात
-
भुजबळांनी जल पूजन करत केली गंगा गोदावरी आरती
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडली कावनई येथे गंगा गोदावरी आरती. कपिलधारा तीर्थावर पार पडली गंगा गोदावरी आरती. भुजबळांनी जल पूजन करत केली गंगा गोदावरी आरती. छगन भुजबळ यांच्या सोबत आमदार हिरामण खोसकर माजी आमदार शिवराम झोले, बबनराव घोलप यांच्यासह साधू महंत पदाधिकारी उपस्थित
-
गोंदियाच्या कटंगी येथे खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप
राज्य सरकारने केलेल्या कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी कुटुंबीयांना दिलासा. पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा.. कटंगीतील कार्यक्रमात प्रमाणपत्रांचे वितरण.. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या हाती…..
-
परतीच्या वारकऱ्यांसाठी कळंबमध्ये भव्य अन्नछत्र
पंढरपूर आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील हजारो वारकऱ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात सेवाभावाचं प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या भोजनाची कोणतीही गैरसोय होऊ नये,या उद्देशाने स्वर्गीय गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने शहरात भव्य अन्नछत्र उभारण्यात आले आहे.या अन्नछत्रामध्ये दररोज हजारो वारकऱ्यांना प्रेमाने,आदराने आणि भक्तिभावाने महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता गेल्या सलग आठ वर्षांपासून ही सेवा अखंडपणे सुरू आहे.
-
सुनील तटकरे यांचे मोठे विधान, अजित पवारांच्या आठवणी जागवल्या
दादांची प्रथम जयंती साजरी करत असताना दादांनी मोठे योगदान दिले..त्यांनी दिलेले विचार नवी पिढीने आत्मसात करावे…१० वी १२ विद्यार्थ्यांचा आज गुणगौर सत्कार करण्यात आला….शेवटी कोणी कोणत्या विषयावरती काय भावना व्यक्त कराव्यात…. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वांना अधिकार आहे….
-
परतीच्या वारकऱ्यांसाठी कळंबमध्ये भव्य अन्नछत्र
पंढरपूर आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील हजारो वारकऱ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात सेवाभावाचं प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या भोजनाची कोणतीही गैरसोय होऊ नये,या उद्देशाने स्वर्गीय गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने शहरात भव्य अन्नछत्र उभारण्यात आले आहे.या अन्नछत्रामध्ये दररोज हजारो वारकऱ्यांना प्रेमाने,आदराने आणि भक्तिभावाने महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता गेल्या सलग आठ वर्षांपासून ही सेवा अखंडपणे सुरू आहे
-
राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा नाही- सुनील तटकरे
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्या बाबत यापूर्वीच सुप्रियाताई ,श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे ,परंतु राजकारणामध्ये आपण म्हणतात त्याप्रमाणे आज तरी दोन्ही राष्ट्रवादी विलीनी करानाची चर्चा तशा प्रकारे कुठेही नाही. योग्यवेळी तशा प्रकारची चर्चा सुरू झाली तर . त्यावेळेसचा विचार त्यावेळेस होईल मात्र आता विलीनिकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे असे अजितदादा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
-
वरण बट्टी व वांग्याच्या भाजी घेण्यासाठी दुकानांवर गर्दी
जळगावमध्ये वरण बट्टी व वांग्याच्या भाजी घेण्यासाठी दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. वरण , बट्टी आणि वांग्याची भाजी घेण्यासाठी दुकानांवर नागरिकांची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीचा उपवास असल्याने हा उपवास सोडण्यासाठी अनेकांच्या घरात वरण बट्टीचा बेत असतो. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे घरच्या महिलांना आराम मिळावा म्हणून अनेक नागरिकांनी वरण बट्टी च्या विक्रीच्या दुकानांवर गर्दी केली आहे.
-
शिवसेना जनतेच्या दारी
मुंबईतील नागरिकांना शासकीय सुविधा थेट दारात मिळाव्यात यासाठी आज नेस्को सेंटरमध्ये एक विशेष अभियान राबवण्यात आले. शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशनच्या वतीने “शिवसेना जनतेच्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी यावेळी मोफत शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष “गुणगौरव सोहळा” देखील पार पडला.
-
इंडिया आघाडीत एकवाक्यता नाही
इंडिया आघाडी गेल्या लोकसभेनंतर ब्लॉक झाली आहे. त्यांच्यात कुठेही एकवाक्यता नाही. दिलेल्या झालेल्या आंदोलनाचा हे सगळे जण आपापल्या पद्धतीने कसा राजकीय फायदा उचलायचा यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा लागल्याचे आपल्याला पाहायला मिळाल्या. कोणातही एक वाक्यता नव्हती, आता इंडिया आघाडी राहिली नाही. भविष्यातही ती राहणार नाही अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
-
उपवर्गीकरण विरोधात RPI आठवले गटाच्या वतीने भव्य निदर्शने
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात RPI आठवले गटाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. सोलापुरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात RPI आठवले गटाच्या वतीने निदर्शन सुरू आहेत.RPI आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात निदर्शने सुरू आहेत. या भव्य निदर्शनासाठी RPI आठवले गटाचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात उद्या सोलापूर शहरात निघणाऱ्या भव्य मोर्चात ही आठवले गट सामील होणार आहे. उद्या रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा निघणार आहे.
-
शरद पवार हे माझे गुरू- दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील यांनी माझे गुरु म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केला. भाषणात बोलताना शरद पवार माझे गुरु आहेत त्यांना वंदन करतो असं म्हणाले. गुरु पौर्णिमा निमित्त दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेतला.
-
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर रुग्णायलात उपचार सुरु
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर रुग्णायलात उपचार सुरु आहे. अभिजीत दिपकेंना टायफॉईडचे निदान झाले होते आणि आता त्यामुळेच त्यांच्यावर रुग्णायलात उपचार सुरु आहे.
-
मंञी आदिती तटकरे यांची मेळघाट विद्यार्थी विष बाधा प्रकरणावर प्रतिक्रिया
मंञी आदिती तटकरे म्हणाल्या की, “मेळघाट मधील टिटवा आश्रम शाळेत फूड पॉइजनिंग झाल्याची घटना माहिती मिळाली. या संदर्भात डॉक्टरांशी मी संवाद देखील साधला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं. यासंदर्भात आदिवासी मंत्री यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे. सेंट्रल किचन मध्ये कोणतं जेवण आणलं गेलं होतं या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.
-
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा पंतप्रधान यांच्याकडे विशेष प्रस्ताव
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे की, आमदार आणि खासदार होण्यासाठी वयोमर्यादा ही 25 वरुन 21 येण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असा प्रस्ताव मांडणार आहेत. वयोमर्यादेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पंतप्रधान यांच्याकडे पाठवला जाणार आहे.
-
सुरतमध्ये अद्यापही 6 फुटांपर्यंत पाणी साचलेले
सुरतमध्ये अद्यापही 6 फुटांपर्यंत पाणी साचलेले आहे. सुरतमध्ये चार दिवसांपासून पावसाची संततधार आहे. अनेक घरांमध्ये आणि घराच्या परिसरात पुराचं पाणी कायम आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांची नागपूरातील महाआरोग्य शिबिरावर प्रतिक्रिया
नागपूरात महाआरोग्य शिबिर आयोजित करून 50 हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी होणार. प्रथितयश डॉक्टर एकत्रित आले त्यामुळे रुग्णांना फायदा होईल असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
रोहित पवार यांचा सरकारला इशारा
10 दिवसात आंदोलक तरुणांवरील गुन्हे मागे घ्या. जर हे गुन्हे मागे घेतले नाही तर सरकारला महागात पडेल असा इशारा आता रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.
-
धुळे संघर्ष समितीच्या वतीने तिरंगा रॅलीचं धुळे शहरात आयोजन
धुळे संघर्ष समितीच्या वतीने तिरंगा रॅलीचं धुळे शहरात आयोजन.. नीट परीक्षेच्या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्यानंतर शहरात तिरंगा रॅलीचं करण्यात आलं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधी च्या पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह विविध राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी. तिरंगा रॅलीत सत्ताधारी भाजप, आरएसएस ,शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी.
-
राहुल गांधी यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र
लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करा.’ अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
-
प्रल्दाह जोशी यांनी आता शिक्षण मंत्रीचा पदभार स्वीकारला
प्रल्दाह जोशी यांनी आता शिक्षण मंत्रीचा पदभार स्वीकारला आहे. धमेंद्र प्रधान यांनी यांच्या पदाचा काल राजीनामा दिला होता. या नंतर जोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
-
“मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे” फडणवीस यांची प्रतिक्रिया
मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे. दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांवर फडणवीस यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. काल ते दिल्लीत जाऊन आल्यानंतर आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
-
धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
हे तरुणाला भेडसवणारे प्रश्न असतात त्यामुळे त्यासंदर्भात मोदींजी संवेदनशीलता दाखवतं योग्य निर्णय घेतला. आणि देशाचे हित लक्षात ठेवून जे काही निर्णय घ्यायला हवा होता तो घेतला आहे.
-
ठाकरे बंधूंच्या अभिनंदन मोर्चासाठी वसई-विरारमधून शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती
ठाकरे बंधूंच्या अभिनंदन मोर्चासाठी वसई-विरारमधून शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले होते. विरार ते चर्चगेट या लोकल रेल्वे प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आणि ‘महाराष्ट्र गीत’ गात उत्साहपूर्ण वातावरणात मोर्चाची सुरुवात केली होती. या प्रवासात शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेकडो कार्यकर्ते रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना होत असून, ठाकरे बंधूंच्या अभिनंदन मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते उत्साहित असल्याचे पाहायला मिळाले.
-
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मोठी गर्दी
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मोठी गर्दी झाली आहे. जल्लोषासाठी शिवतीर्थवर जेन-झी मोठ्या संख्येने पोहोचले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी मंत्री संजय शिरसाट दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी मंत्री संजय शिरसाट दाखल झाले आहेत. अभिजीत दीपक यांच्या आई आणि वडिलांसोबत संजय शिरसाट संवाद साधत आहेत. अभिजीत दीपके यांच्या तब्येतीची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विचारपूस सुरू आहे.
-
जल्लोष सभेनंतर उद्धव ठाकरे – राज ठाकरे यांचं तरुणांना अभिवादन
शिवतीर्थवरील जल्लोष सभेनंतर उद्धव ठाकरे – राज ठाकरे यांनी बाल्कनीमधून तरुणाईला अभिवादन केलं. यावेळी शर्मिला आणि रश्मी ठाकरेसुद्धा तिथे उपस्थित होत्या. तर संजय राऊत यांच्याही चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.
-
तरुणांसमोर अमित ठाकरे नतमस्तक
शिवतीर्थवर झालेल्या गर्दीसमोर अमित ठाकरे नतमस्तक झाले आहेत. मंचावर डोकं टेकवून त्यांनी तरुणाईला नमस्कार केला आहे.
-
महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजलंय- राज ठाकरे
महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजलं आहे. मी संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
-
तरुणांच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी केली जाईल- उद्धव ठाकरे
ही ठिणगी आता पडली, देशभर वणवा पेटलाय. निवडणूक गेल्या खड्ड्यात. ही मनं आता पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं हे आपलं काम आहे. आता हे भोंदुत्व स्वीकारणारे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. खरोखर तरुणांनी देशाच्या सुवर्ण इतिहासातील एक पान लिहिलं आहे. तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी केली जाईल. सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
मोदीजी तुमचे मंत्री, त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त- उद्धव ठाकरे
मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री, त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांना आता देशाचं काम करायला सांगा. कारण अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत. पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. इथे देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नव्हे रस्ता मंत्री, ते इथेनॉलवर बोलत आहेत. हा पुढचा विषय नक्की आहे. मोदींना मला सांगायचंय की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
-
एका झुरळाने हुकुमशाहला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार- उद्धव ठाकरे
तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकलं नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. या संघर्षात जात,पात, धर्म विसरून ‘मी भारतीय’ म्हणत आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं की, एका झुरळाने हुकुमशाहला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
या देशातले जेन-झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे आंदोलनातून समजलं- राज ठाकरे
जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, त्या आंदोलनाला यश आलं. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले जेन-झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे आंदोलनातून समजलं, असं राज ठाकरे म्हणाले.
-
ठाकरे बंधु सभास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले
ठाकरे बंधु सभास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. मोठ्या संख्येने तरुणांनी, चिमुकल्यांनी या सभेसाठी उपस्थिती लावली आहे.
-
यात्रेसाठी ठाकरे बंधू एकत्रच निघणार
उद्धव ठाकरे जल्लोष यात्रेसाठी मातोश्रीहून रवाना झाले आहेत. आता ते राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहे. आता यात्रेसाठी दोघे एकत्रच निघणार आहेत.
-
उद्धव ठाकरे जल्लोष यात्रेसाठी मातोश्रीहून रवाना
उद्धव ठाकरे जल्लोष यात्रेसाठी मातोश्रीहून रवाना झाले आहेत. जल्लोष यात्रेत सहभागी होण्यासाठी शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
-
चारकोप विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्त्यांनी आज विजय यात्रेत सहभागी होण्यासाठी एक आगळा-वेगळा मार्ग अवलंबला
चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश सालवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते आज सकाळी कांदिवली येथून कोळी बँडच्या गजरात दादरच्या दिशेने रवाना झाले. या विजय यात्रेचे खास आकर्षण म्हणजे कार्यकर्त्यांनी कॉकरोचचा वेश परिधान केला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रतीकात्मक प्रहार करणारे पोस्टरही यावेळी हात घेण्यात आले होते. ढोल-ताशांच्या तालावर आणि कोळी बँडच्या साथीने निघालेल्या या यात्रेने कांदिवली स्टेशन परिसरात चांगलीच चर्चा रंगवली.
-
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झालीये… मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातील मंदिरे अद्यापही पाण्यात आहेत. दैनंदिन पूजाविधीसह नदीकाठ परिसरातील व्यवसाावर पुरामुळे परिणाम झाले आहेत.
-
भगवे झेंडे, आणि जोरदार घोषणाबाजीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये राजकीय रंग
“धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है” अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. भगवे झेंडे, आणि जोरदार घोषणाबाजीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसले. काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ठाकरे बंधू तरुणांना कोणता संदेश देणार, सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवर निशाणा साधणार आणि आगामी राजकीय दिशा काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय उत्साह आहे.
-
भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात पोलिसांची एकाच वेळी 3 ठिकाणी छापेमारी
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारद पोलिसांनी वालसावंगी गावात गोपनीय माहितीच्या आधारे एकाच वेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये जवळपास 55 हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या 1098 बाटल्या जप्त केल्या असून तीन जणांवर पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून या परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
-
ठाकरे बंधूंच्या सभेची उत्सुकता शिगेला; कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना
मनसैनिक पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकडे रवाना झाले आहेत. रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण दणाणून गेले.
-
जल्लोषासाठी शिवसैनिक, मनसैनिक एकत्र ठाण्याहून रवाना होणार
ठाकरे बंधुंच्या संयुक्त तिरंगा विजय जल्लोषासाठी ठाण्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रेल्वेने ठाणे स्थानक येथून रवाना होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज मुंबईत ‘ठाकरे बंधूं’ची संयुक्त तिरंगा विजय जल्लोष पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी वर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि केंद्र सरकारच्या विरोधात ‘ठाकरे बंधूं’ची तोफ धडाडणार.
-
सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका – संजय राऊत
“तरुणांची भाषा, तरुणांचे विचार या पिढीपेक्षा वेगळे आहेत. भाजपच्या आयटी सेलला सुद्धा त्यांच्यापुढे टाळं लावावं लागलं. यशस्वी आंदोलनाचा बोध हाच आहे की, सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका. हिटलरसारखे वागालं तर हिटलरच्या मार्गाने सत्ताधाऱ्यांना जावं लागेल” असं संजय राऊत म्हणाले.
-
मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात, तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो – संजय राऊत
“युवा शक्तीच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात, तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो. 20 ते 21 मुलं या लढयात बळी पडलेली आहेत. आनंद साजरा करताना हे विसरता येणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे. कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकलेला नाही” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
-
ठाकरे बंधुंच्या जल्लोष सभेसाठी कल्याण स्थानकावर मोठी गर्दी
ठाकरे बंधुंच्या जल्लोष सभेसाठी कल्याणहून मनसैनिकांचा मुंबईकडे लोंढा. रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी. वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेसाठी कल्याण रेल्वे स्थानकावर शेकडो मनसैनिकांची मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी. कार्यकर्ते मोठ्या उत्साहात लोकलने प्रवास करत मुंबईच्या दिशेने कार्यकर्ते रवाना. स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या आंदोलनाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सभेचे आयोजन.
-
ठाकरेंच्या सभेपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात दंगल पथक तैनात
ठाकरे बंधुंच्या विजयी सभेपूर्वी दादरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात दंगल पथक तैनात. खासगी वाहनांना पार्किंगची परवानगी नाही. विद्यार्थ्यांच्या जल्लोषासाठी दादरमध्ये सुरक्षा वाढवली. पार्कात कोणत्याही प्रकारचे राजकीय बॅनर नाहीत.
-
झुरळांनी ‘बेगॉन’ला हरवलं; संदीप देशपांडेंची मोदी सरकारवर टीका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. झुरळांनी ‘बेगॉन’ला हरवलं, अशी सोशल मीडियावर पोस्ट करत देशपांडे यांनी सरकारवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी शिवाजी पार्कवर त्यांच्या टी-शर्टवरील संदेशानेही लक्ष वेधलं.
झुरळांनी बेगॉन ला हरवलं pic.twitter.com/xocwfbaIOD
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2026
-
अंबरनाथमध्ये अनधिकृत घरे अधिकृत होणार
अंबरनाथमध्ये शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं अधिकृत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे त्यांनी नागरिकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून देण्याचं आवाहन केलं आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
-
लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार
लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेतही घडामोडींना वेग आलाय. सरकारच्या भूमिकेवर विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
-
शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सकाळी 11 वाजता सभा
मुंबईतील दादरच्या वीर सावरकर मार्गावर उद्धव ठाकरे यांची जल्लोष सभा होईल. दोन्ही ठाकरे बंधूची सभा सकाळी 11 वाजता होईल. या सभेला मोठ्या संख्याने तरुण हजर राहण्याची शक्यता आहे. या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
मुंबईच्या वांद्रे परिसरातील प्रसिद्ध रंगशारदा हॉटेल ईडीकडून जप्त
वांद्रे परिसरात असणारे प्रसिद्ध रंगशारदा हॉटेल ईडीकडून जप्त करण्यात आलं आहे. रंगशारदा हॉटेलची जप्त केलेली ३३२ कोटी इतकी असल्याचे ईडीने म्हटलंय. रंगशारदा हॉटेल्स प्रकरणात ही फसवणूक केल्याचा प्रभुदास लोटिया यांच्यावर आरोप करण्यात आलाय. ईडीने रंगशारदा प्रकरणातील कथित मनी लॉन्डरिंग तपासात कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.
-
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया व्हायरल
धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी कॉक्रोच जनता पार्टीचं अभिनंदन केलं आहे. आता प्रधान यांच्या राजीनाम्यावरील सेलिब्रिटींची प्रतिक्रिया व्हायरल होऊ लागल्या आहेत.
Published On - Jul 26,2026 7:59 AM
