ऑपरेशन सिंदूरमध्ये असं काय घडलं जे गुलदस्त्यात आहे? सैन्याचे पाय का ओढले?; उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची स्थिती असताना सैन्याचे पाय का ओढले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पहलगाम हल्ल्याचे कारण आणि त्यासाठी जबाबदार कोण, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काश्मीरमधील परिस्थिती आणि 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचं कंबरडं मोडून भारतीय सैन्य परत येईल अशी परिस्थिती होती. मग नेमकं असं काय घडलं की जे गुलदस्त्यात आहे. ऐनवेळी तुम्ही भारतीय सैन्याचे पाय का ओढले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला केला आहे. तसेच पपहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी गेले कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे.
ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीवरून फडणवीस सरकारवर हल्ला चढवतानाच केंद्रातील मोदी सरकारलाही घेरलं आहे. ऑपरेशन सिंदूरवरून तर त्यांनी मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचं कंबरडं मोडून भारतीय सैन्य येईल अशी परिस्थिती होती. तशा बातम्या आपल्याकडे येत होत्या. एक परिस्थिती होती की पाकिस्तान आता मोडणार. पाकचे तुकडे होणार. कराचीवर हल्ला झाला. रावळपिंडीवर हल्ला झाला. लाहोरवर हल्ला झाल्याचं सांगितलं जात होतं. इंदिरा गांधींनी जे केलं, तसं होणार असं वाटत होतं, तशी परिस्थिती होती. सर्व आनंदात होते. पाकिस्तानला धडा शिकवला जात आहे, असं सर्वांना वाटत होतं. मग असं काय घडलं की जे गुलदस्त्यात आहे, सैन्याचे पाय तुम्ही का ओढले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
हल्ला होऊच कसा शकला?
सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलं होतं. आपलं सैन्य भीमपराक्रमी आहे. त्यांच्या क्षमतेबद्दल कुणीही शंका घेणार नाही. मग हे घडलं कसं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुळात पहलगामचा हल्ला होऊ कसा शकला? याचं कारण असं काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे असं सातत्याने सांगितलं जात होतं. ती व्हायलाच पाहिजे. कारण काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच त्याला 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता, असंही ते म्हणाले.
याला जबाबदार कोण?
तिकडे पर्यटन सुरू झालं होतं. पुरेसा बंदोबस्त तिथे ठेवण्याची गरज होती. कारण आपण सारं काही अलबेल असं नव्हतं. बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करून चालत नाही. गलथानपणा, दुर्लक्ष झालं, हल्ल्याची जबाबदारी कुणी घेतली? सैन्याच्या शौर्याला सलाम आहेच. पण पर्यटक तिकडे बिनधास्तपणे गेले होते. आपलं काश्मीर म्हणून गेले होते. त्यांच्यावर अचानक गोळीबार होतो. सर्वांच्या डोळ्या देखत होत्याचं नव्हतं होतं. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला.
