केंद्रात-राज्यात सत्तेत एकत्र मग महापालिका निवडणुकीत युती का तुटली? अजित दादांनी दिले स्पष्टीकरण

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना महानगर पालिकांच्या निवडणुकीत युती का तुटली यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे.

केंद्रात-राज्यात सत्तेत एकत्र मग महापालिका निवडणुकीत युती का तुटली? अजित दादांनी दिले स्पष्टीकरण
Mahayuti
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 04, 2026 | 10:43 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारसभा घेत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना महानगर पालिकांच्या निवडणुकीत युती का तुटली यावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

विकासाची घोडदौड सुरू आहे…

अजित दादांनी आपल्या भाषणात म्हटले की, गेल्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणुका लढलो आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला. पण यावेळेसची निवडणूक वेगळी आहे. आम्ही केंद्र सरकारमध्ये एकत्र आहोत, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड चालू आहे. राज्यामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मी आणि आमचे सर्व सहकारी काम करत आहोत.

युती का नाही?

अजित दादा पुढे बोलताना म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वेगळे चित्र पहायला मिळत आहे. सुज्ञ मतदारांना प्रश्न पडला असेल की केंद्रात हे सोबत आहेत, राज्यात बरोबर आहेत, मग इथे युती का नाही? मी आपल्याला स्पष्ट सांगतो, मागे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते, त्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीचेही सरकार होते. केंद्रात युपीएच सरकार होतं. तिथे डॉक्टर मनमोहन सिंग होते. राज्यात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे मान्यवर होते. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही तिथले प्रश्न म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहत होतो. आज तोच प्रसंग आपल्या सर्वांच्या समोर आला आहे.’

केंद्राचा राज्याचा दोष नाही पण…

आपल्या भाषणात पुढे, ‘केंद्र आणि राज्य सरकार ही दोन्ही सरकारं राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत भरभरून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विकासाला निधी देतात. मेट्रो करायला निधी देतात, हायवेसाठी निधी देतात. वेगवेगळ्या योजनांसाठी निधी देतात. परंतू हे सगळं करत असताना गेले काही वर्षे ज्या कारभाऱ्यांच्या हातामध्ये पुणे महानगर पालिकेची सुत्रे आहेत, काय अवस्था आहे? केंद्राचा राज्याचा दोष नाही पण इथल्या त्रिमुर्तींचा दोष आहे’ असं अजित पवार यांनी म्हटले आहे.