India Pakistan War : भारत-पाकिस्तानमध्ये पुढचं युद्ध कधी? इराण-इस्रायल संघर्षातून आपल्यासाठी काय धडा?
India Pakistan War : पाकिस्तान हा देश कुत्र्याच्या शेपटासारखा आहे. कुत्र्याच शेपूट वाकड ते वाकडच. आतापर्यंत भारताकडून बऱ्याचवेळा मार खाऊनही हा देश सुधरलेला नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये पुढचं युद्ध कधी होणार? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचाच आढावा आजच्या लेखातून घेण्यात आला.

भारत-पाकिस्तान संघर्ष खूप जुना आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून ही लढाई सुरु आहे. कित्येक दशकापासून दोन्ही देशांमध्ये वैरभाव, अविश्वास, मतभेद कायम आहेत. हा वाद, संघर्ष, भांडण वाढवण्यासाठी पाकिस्तानची प्रवृत्ती कारणीभूत आहे. 1947 साली एकाबाजूला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाल्याचा आनंद होता. त्याचवेळी फाळणीच दु:ख होतं. भारताला स्वातंत्र्य मिळत असताना, दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. यात अनेक निरपराध नागरिक मारले गेले. भारताच्या स्थापनेपासून आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध चार युद्ध झाली आहेत. 1948, 1965, 1971 आणि 1999. यात तीन लढाया काश्मीरच्या मुद्यावरुन झाल्या आहेत. 1971 आणि 1999 च्या लढाईत भारताने पाकिस्तानवर निर्विवाद विजय मिळवला. 1971 च्या लढाईत पाकिस्तानचा सर्वात मोठा मानहानीकारक पराभव झाला. हजारो पाकिस्तानी सैनिकांना आपली शस्त्र खाली ठेवावी लागली. बांग्लादेश मुक्ती संग्रामाची ही लढाई होती. भारतीय सैन्य दलांनी असा पराक्रम गाजवला की, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.
1971 च्या लढाईतला पराभव आजही पाकिस्तानला बोचतो. हा पराभव पाकिस्तानच्या खूप जिव्हारी लागला. कारण पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. आजही जेव्हा कधी भारत-पाकिस्तान संघर्षाचा विषय येतो, तेव्हा 1971 च्या लढाईतल्या विजयाचे किस्से सांगितले जातात. त्यानंतर 1999 साली चौथं युद्ध झालं. हे युद्ध मर्यादीत स्वरुपाच होतं. भारतीय सैन्याने सीमारेषा न ओलांडता पाकिस्तानच काम तमाम केलं. पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सगळी रणनिती आखली होती. हिवाळी ऋतुचा फायदा घेऊन पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलमधील टेकड्या बळकवल्या होत्या. भारताला काश्मीरशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग थेट पाकिस्तानच्या रेंजमध्ये येत होता. ही लढाई माऊंटन युद्धाचा भाग होती. एका मेंढपाळाच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानने घुसखोरी केल्याच भारतीय सैन्याला समजलं.
एअर फोर्सकडून प्रथमच लेझर गाइडेड बॉम्बचा वापर
त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन लॉन्च केलं. उंचावर दबा धरुन बसलेले पाकिस्तानी सैनिक सहजतेने भारतीय जवानांना टार्गेट करत होते. त्यामुळे एअर फोर्सच्या मदतीची गरज लागली. एअर फोर्सने या ऑपरेशनला ‘सफेद सागर’ नाव दिलं. सुरुवातीला भारताने या लढाईत काही फायटर जेट्स गमावली. कारण खूप उंचावरुन उड्डाण करताना अचूक ठिकाणी बॉम्बफेक करणं सोपं नव्हतं. त्यात हवामानच आव्हान होतं. पण याच युद्धात इंडियन एअर फोर्सने सर्वप्रथम लेझर गाइडेड बॉम्बचा वापर केला. मिराज विमानांमधून अचूक ठिकाणी लेझर गाइडेड बॉम्ब फेकण्यात आले. त्यानंतर युद्धाची दिशाच बदलली. भारताच्या पायदळाने सुद्धा आपला सर्वोच्च पराक्रम दाखवत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावलं.
आपली राहती घर सोडून पळावं लागलं
1971 च्या युद्धात दारुण पराभव झाल्यानंतर आपण भारताला आमने-सामनेच्या लढाईत कधीच हरवू शकत नाही, हे पाकिस्तानला कळून चुकलं. म्हणून त्यांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबला. काश्मीरकडे वळण्याआधी त्यांनी पंजाबमधील फुटीरतवादाला प्रोत्साहन दिलं. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र व अन्य मदत पुरवली. पण भारत सरकारने प्रसंगी सैन्य कारवाई करत स्वतंत्र खलिस्तानचा लढा मोडून काढला. त्यानंतर 90 च्या दशकात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला पाठबळ दिलं. 90 च्या दशकात भारतात स्थिर सरकारं सत्तेवर नव्हती. त्या परिस्थितीचा पाकिस्तानने फायदा उचलला. काश्मिरी तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादाच्या मार्गाकडे वळण्यासाठी भाग पाडलं. परिणामी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला. काश्मिरी पंडितांना आपली राहती घर सोडून पळावं लागलं. ज्याप्रमाणे भारताने बांग्लादेशला वेगळं केलं, तसं काहीही करुन भारतापासून काश्मीर स्वतंत्र करायचा हाच एकमेव उद्देश पाकिस्तानचा होता. त्यातूनच गेल्या साडेचार दशकांपासून काश्मीरमधील हा रक्तरंजित संघर्ष सुरु आहे.
पाकिस्तानची एक चूक युद्धाला कारण ठरेल
पाकिस्तानसोबत आतापर्यंत जी चार युद्ध झाली त्यात 20 ते 23 वर्षांच अंतर राहिलं आहे. पण मागच्या दहावर्षात पाकिस्तानसोबत थेट संघर्षाचे तीन मोठे प्रसंग आले. यात दोनवेळा युद्धापर्यंत स्थिती जाऊन पोहोचली होती. म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्यावेळी जे झालं, ते युद्धच होतं. फक्त त्याची अधिकृत घोषणा झाली नाही. 2016 साली उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ल्यानंतर बालकोट एअर स्ट्राइक आणि पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर. यात 2019 आणि 2025 दोनवेळा युद्धाची स्थिती निर्माण व्हायला पाकिस्तानच दहशतवाद पुरस्कारच धोरण जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरच केलय की, यापुढे पाकिस्तानकडून कुठलीही दहशतवादाची कृती ही युद्धच मानली जाईल. त्यामुळे पाकिस्तानची एक चूक युद्धाला कारणीभूत ठरु शकते. 2014 च्या आधी म्हणजे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येण्याआधीच्या सरकारांची काश्मीरबद्दलची भूमिका थोडी सौम्य होती. पण मोदी सरकारची काश्मीरबद्दलची भूमिका ठाम आणि आक्रमक आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानला काश्मीर मुद्यावर चर्चा करायची असेल, तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलावं. त्याशिवाय अन्य मुद्यांवर चर्चा होऊ शकत नाही हे या केंद्र सरकारच स्पष्ट धोरण आहे.
काश्मीरचा विषय जिवंत ठेवणं पाकिस्तानची मजबुरी
काश्मीरचा विषय हा पाकिस्तानातले सैन्याचे प्रमुख आणि तिथल्या राजकारण्यांसाठी जिवंत राहण्याचा विषय आहे. पाकिस्तानात सध्या गरीबी आहे, त्यांची अर्थव्यवस्था कोसळलेली आहे. अंतर्गत यादवी तिथे माजली आहे. खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि सिंध या तीन प्रांतात पाकिस्तानचा पंजाब प्रांत आणि त्यांच्या नेत्यांविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. पाकिस्तानच्या अन्य प्रांतातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट तसच पाणी सुद्धा पंजाबकडे वळवलं जातं. त्यामुळे पाकिस्तानातील पंजाब एक सधन प्रांत ठरतो. पण अन्य प्रांतामध्ये गरिबीची स्थिती आहे. आर्थिक दृष्टया हे भाग मागासलेले आहेत. बलूचिस्तानच्या संघर्षाच हेच मूळ कारण आहे. हा विखुरलेला पाकिस्तान संभाळताना त्यांचे नाकीनऊ येत आहेत. पण या सगळ्या पाकिस्तानला एकत्र आणण्याचा टॉनिक म्हणजे काश्मीर आणि भारत विरोध. म्हणून तिथले सैन्य अधिकारी आणि राजकीय नेते काश्मीरचा विषय जिवंत ठेवणार. त्यातून त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
त्यातच पाकिस्तानी राजकर्त्यांचा फायदा
काश्मीरचा मुद्दा पाकिस्तान हातून जाऊ देणार नाही. म्हणूनच ऑपरेशन सिंदूरमध्ये मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानचा जिहादी विचारांचा लष्कप्रमुख असीम मुनीरने काश्मीरच राग पुन्हा आळवला. भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध कधीही भडकू शकतं. कारण काश्मीरच मुद्दा जिवंत ठेवण्यातच पाकिस्तानी राजकर्त्यांचा फायदा आहे.
पाकिस्तानने युद्धाची व्याप्ती वाढवली
ऑपरेशन सिंदूर हे भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात लॉन्च केलं होतं. त्या अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. दहशतवादाची मुख्यालय उद्धवस्त केली. पण पाकिस्तानी सैन्याने दहशतवादी तळांवरील हल्ले आपल्यावरील कारवाई मानली. त्यांनी भारतावर प्रतिहल्ले चढवले. महत्त्वाचे म्हणजे त्यांची प्रत्युत्तराची कारवाई फक्त काश्मीरपर्यत मर्यादीत नव्हती. त्यांनी श्रीनगरपासून गुजरातच्या भूजपर्यंत हल्ले करण्याचा प्रयत्न केला. राजस्थान जैसलमेरमध्ये सुद्धा हल्ले केले. आतापर्यंत दोन्ही देशांमधला संघर्ष काश्मीरच्या सीमेपुरता मर्यादीत होता. पण पाकिस्तानने युद्धाची नवी आखणी केली. भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने त्यांचे हे हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले.
इराण-इस्रायल युद्धातून आपल्यासाठी काय धडा?
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने सर्वाधिक ड्रोन्सचा वापर केला. मिसाइल्स सुद्धा डागली. यात बॅलेस्टिक मिसाइल्स सुद्धा होते. भारताने हे बॅलेस्टिक मिसाइल्स पाडण्यासाठी S-400, आकाश या या एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर केला. ड्रोन्स नष्ट करण्यासाठी गन मशीन्स वापरली. नुकत्याच संपलेल्या इराण-इस्रायल युद्धाचा आढावा घेतला, तर इस्रायलने इराणच खूप नुकसान केलं. पण इराणने सुद्धा इस्रायलवर तितकेच भयानक मिसाइल हल्ले केले. त्यात इस्रायली शहरांच सुद्धा नुकसान झालं. इस्रायलकडे आर्यन डोम, डेविड स्लीज आणि एरो अशी तिहेरी एअर डिफेन्स सिस्टिम आहे. तरीही इराणने ही सिस्टिम भेदली. त्यांनी मोठ्या प्रमाणात हायस्पीड बॅलेस्टिक, हायपरसोनिक मिसाइल्सचा वापर केला. पाकिस्तान सुद्धा भविष्यात अशाच प्रकारची मिसाइल्स वापरु शकतो. त्यामुळे आपल्याकडे त्या तोडीची एअर डिफेन्स सिस्टिम असणं आवश्यक आहे. यात S-500 आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कारण या सिस्टिममध्ये हायपरसोनिक मिसाइल्सना रोखण्याची क्षमता आहे.
