‘सी.पी. राधाकृष्णन हे एक उत्तम उपराष्ट्रपती असतील’, PM मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ
भाजप्रणित एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांनी उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी आज (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपप्रणित एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांनी उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी आज (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मोदींनी, राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांच्याशी असलेल्या नात्यावरही भाष्य केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, ‘मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील! मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो आणि त्यांची सेवेची आवड पाहिली आहे’. या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांच्याबाबत माहिती सांगितली आहे, तसेच दोघांच्या मैत्रीवरही भाष्य केले आहे.
आमच्या दोघांचे केसही काळे होते…
व्हिडिओच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणतात की, मी माझ्या एका खूप जुन्या मित्राची ओळख करून देत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, या नात्याला अनेक वर्षे झाली आहेत. पंतप्रधान मोदी हसत म्हणत आहेत की, माझेही केस काळे होते आणि राधाकृष्णनजींचे केसही काळे होते. या व्हिडिओमध्ये राधाकृष्णन आणि पंतप्रधान मोदींचे जुने फोटोही दिसत आहेत.
View this post on Instagram
तामिळनाडूचा मुलगा राज्यसभेत सर्वोच्च पदावर बसणार
या व्हिडिओत पुढे बोलताना पंतप्रधान मोदी लोकसभेत असलेल्या सेंगोलचा उल्लेख करतात आणि म्हणतात की, तामिळनाडूतील सेंगोल लोकसभेत सर्वोच्च पदावर आहे, आता तमिळनाडूचा एक मुलगा राज्यसभेतही सर्वोच्च पदावर बसणार आहे. मोदी पुढे सांगतात की, राधाकृष्णन हे एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत, ते मागास समाजातून आलेले आहेत. ते आज देशाच्या या उच्च पदाकडे वाटचाल करत आहेत. राधाकृष्णन हे एक खेळाडू होते. पण ते येथे खेळाडू म्हणून आलेले नाहीत. त्यांनी कधीही राजकारणात खेळ केला नाही. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, चिराग पासवान हे नेतेही दिसत आहेत.
सीपी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
सीपी राधाकृष्णन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. आता 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपदासाठी मतदान होणार आहे.
