दत्ता पडसलगीकर आता अजित डोभाल यांच्या टीममध्ये, राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी वर्णी

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

दत्ता पडसलगीकर आता अजित डोभाल यांच्या टीममध्ये, राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी वर्णी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर (Datta Padsalgikar) यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर (Datta Padsalgikar Deputy NSA) आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांचे सहाय्यक म्हणून काम करतील.

दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. दोन विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार निवृत्त होत असल्याने पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

दत्ता पडसलगीकर हे 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर परदेशातील तपास कामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पडसलगीकरांच्या तपास कार्यामुळेच दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांदरम्यान झालेलं संभाषण आणि पुरावे परदेशी यंत्रणांकडून मिळणं शक्य झालं होतं.

मुंबईतील कुख्यात गुंड अमर नाईकला पडसलगीकरांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईतच कंठस्नान घालण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर पडसलगीकर यांनीच अरुण गवळी टोळीचेही तीन तेरा वाजवले होते. पोलिस उपायुक्तपदी असताना पडसलगीकरांनी कामाठीपुऱ्यातील कुंटणखान्यातून त्यांनी जवळपास 450 अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांचं पुनर्वसन केलं होतं.

दत्ता पडसलगीकर यांनी नागपूरमध्ये सेवा बजावताना मटका आणि बेकायदेशीर दारुविक्रीला आळा घातला होता. उस्मानाबादमध्ये पोलिस अधीक्षक असताना त्यांनी निजामाविरोधातील कारवाईत शहीद झालेल्या पोलिसांच्या पत्नींना 30 वर्षानंतर पेन्शन सुरु करुन दिलं होतं.

पडसलगीकर (Datta Padsalgikar Deputy NSA) यांची 2016 मध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी दहा वर्ष त्यांनी आयबीमध्ये सेवा बजावली होती. त्यांनी नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *