मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक झटका, व्यापार कराराबाबत घेतला मोठा निर्णय
अमेरिकेने दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील सहाव्या फेरीच्या चर्चेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आता बिघडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करातून भारताला कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील सहाव्या फेरीच्या चर्चेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. कराराबाबत 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान दिल्लीत चर्चेची सहावी फेरी रंगणार होती, मात्र आता ती स्थगित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचा फटका भारताला बसणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारताला मोठा धक्का
भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार कराराबाबत पाच फेऱ्या झाल्या आहेत. आता 25 ऑगस्टला सहावी फेरी होणार होती, मात्र ती आता स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता करार लांबला आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम व्यापारावर होणार आहे. कारण अमेरिकेने लादलेला अतिरिक्त 25 टक्के कर 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे.
कर लादल्याचा परिणाम
अमेरिकेने भारतावर 25 टक्के कर लावला होता, मात्र रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्यामुळ भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. हा कर 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या व्यापारावर याचा थेट परिणाम होणार आहे.
भारत-अमेरिका व्यापार
वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल-जुलै 2025 या काळात भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात 21.6 % वाढून 33.53 अब्ज डॉलर झाली आहे. तसेच या काळात अमेरिकेतून भारतात होणारी आयात 12.33 % वाढून 17.41 अब्ज डॉलर झाली आहे. मात्र आता या व्यापारावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
दिलासा मिळणार?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम शुल्क लादले जाणार नाही असं ट्रम्प यांनी 15 ऑगस्ट रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतल्यानंतर म्हटले होते, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
