थोडी जास्त खिचडी द्या म्हणताच कर्मचाऱ्याचा पारा चढला; वृद्ध महिलेसोबत केलं असं काही… पाहून तुमचाही उडेल थरकाप
उत्तर प्रदेशातील जालौन येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नातवासाठी जास्तीची खिचडी मागितल्याने कॅन्टीन कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केला.

आपल्या तान्ह्या नातवासाठी अन्न मागायला गेलेल्या एका वृद्ध महिलेवर कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात कर्मचाऱ्याने महिलेच्या डोक्यावर मोठ्या चमच्याने वार केला. ज्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. उत्तर प्रदेशातील जालौन येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
जालौनच्या ओराई कोतवाली परिसरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एका लहान मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची आजी रुग्णालयात त्याची देखभाल करण्यासाठी थांबली होती. दुपारी कॅन्टीनमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खिचडीचे वाटप सुरु होते. त्याची आजी तिथे पोहोचली. तिने कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मला नातवासाठी थोडी जास्त खिचडी मिळेल का, अशी विचारणा केली. तिने नातवासाठी ताटात थोडी जास्त खिचडी वाढण्याच्या विनंतीवरुन कॅन्टिन कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
या वादाचे रूपांतर रागात झाले. संबंधित कर्मचाऱ्याने हातात असलेला मोठा चमचा थेट महिलेच्या डोक्यावर मारला. हा प्रहार इतका जोरात होता की महिलेचे डोके फुटले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धेला पाहून रुग्णालयात एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आपत्कालीन कक्षात (Emergency Ward) हलवण्यात आले.
पोलीस घटनास्थळी दाखल
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखम खोल असल्याने तिला टाके घालावे लागले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अमानवीय कृत्याची माहिती मिळताच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तातडीने कडक पावले उचलली आहेत. संबंधित दोषी कर्मचाऱ्याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच, कॅन्टीन चालवणाऱ्या कंत्राटदाराला कडक इशारा देण्यात आला आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडल्यास कंत्राट रद्द करण्याची तंबी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच ओराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अटकेच्या भीतीने आरोपी कर्मचारी पसार झाला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
