Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराची स्थिती काय? एस जयशंकर यांनी दिली लेटेस्ट अपडेट
भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्या संपल्या आहेत. अशातच आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराबाबत मोठी अपडेट दिली आहे.

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्या संपल्या आहेत. अशातच आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘काही समस्या आणि मुद्दे अद्यापही सुटलेले नाहीत. मात्र इतर क्षेत्रातील संबंधांवर परिणाम होईल इतक्यापर्यंत त्यांना ताणले जाण्याची गरज नाही. सध्या चर्चा सुरु आहे.’ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेसोबत काही समस्या आहेत
कौटिल्य आर्थिक परिषदेच्या चौथ्या हंगामात बोलताना डॉ. जयशंकर यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी आर्थिक, व्यापार आणि राजकीय भविष्याबाबत भारताचा दृष्टिकोन काय आहे त्याची माहिती दिली. अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘अमेरिकेसोबत काही समस्या आहेत. याचे कारण म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेतून ठोस तोडगा निघालेला नाही. यामुळे भारतावर दोन प्रकारचे टॅरिफ लादण्यात आले आहे.
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर कर लादला आहे. यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, ‘भारताला टार्गेट केले जात आहे, तर इतर देशांनीही तेच केले आहे. कराराबाबत काही समस्या आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करुन उपाय शोधणे आवश्यक आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.’
पुढील क्वाड बैठक भारतात होणार
पुढे बोलताना जयशंकर यांनी अमेरिका, ‘भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वाड गटाबाबत माहिती दिली. याबाबत भारत पूर्णपणे सक्रिय आहे आणि आपले काम करत आहे. या वर्षी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन बैठका आधीच झाल्या आहेत. हा एक महत्त्वाचा गट आहे आणि पुढील क्वाड बैठक भारतात होणार आहे.’
भारत इतर देशांसोबतही व्यापार करत आहे. यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, ‘सुरुवातीला मुक्त व्यापार करार (FTA) बहुतेक आशियाई देशांसोबत होते. मात्र आता अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अधिक स्पर्धात्मक होत आहेत, पुरवठा साखळीत वेग आला आहे त्यामुळे चीनसाठी मार्ग मोकळा होत आहे. आमचे लक्ष शाश्वत अर्थव्यवस्थांवर आहे. त्यामुळे भारत युकेसोबतच्या FTA वर समाधानी आहे.’
