Indigo : इंडिगोचा गोंधळ संपला ? कंपनीचा मोठा दावा काय ? 610 कोटींचा रिफंड पण…
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोमध्ये गेल्या आठवड्यात उद्भवलेल्या गोंधळामुळे हजारो प्रवाशांना त्रास झाला. मात्र आता कंपनीने परिस्थिती सुधारत असल्याचा दावा केला आहे. रविवारी १६५० उड्डाणे झाल्याचे आणि ६१० कोटी रुपयांचे रिफंड वाटप सुरू झाल्याचे कंपनीने सांगितले. रद्द झालेल्या उड्डाणांचे पैसे परत मिळून प्रवाशांना दिलासा मिळत आहे, तसेच हरवलेले सामानही परत केले जात आहे.

देशातील सर्वा मोठी लो कॉस्ट एअरलाइन कंपनी असल्याचा दावा करणाऱ्या इंडिगो एअरलनाइन्समध्ये गेल्या आठवड्याभरात सावाळा गोंधळ होता, त्यामुळे लाखो प्रवासी अडकले आणि गदारोळ झाला. मात्र अखेर आता या एअरलाइन्सचा कार्यपद्धतीत सुधारणा होत आहे, असा दावा खुद्द कंपनीकडूनच करण्यात आला आहे. रविवारी इंडिगोच्या 1650 विमानांचे उड्डाण झाल्याच कंपनीतर्फे सांगण्यात आलं. आम्ही हळूहळू पण निश्चितच सामान्य स्थितीत येत आहोत, असाही दावा करण्यात आला आहे. इंडिगो कंपनीने रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आत्तापर्यंत 610 कोटींचा परतावा अर्थात रिफंड देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांच्या तीन हजारहून अधिक बॅगा देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
1650 उड्डाणं झाल्याचा दावा
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांनी असा दावा केला की, हळूहळू आम्ही सामान्य स्थितीत परतत आहोत आणि रविवारी एअरलाइन्सने सुमारे 1650 उड्डाणं केली. गेल्या काही दिवसांत शेकडो उड्डाणे रद्द आणि विलंबामुळे हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या अंतर्गत व्हिडिओ संदेशात, अल्बर्स म्हणाले की रविवारी वेळेवर कामगिरी (OTP) 75 टक्के असण्याची अपेक्षा होती. ते म्हणाले की (रविवारी) आम्ही प्रणालीमध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे आम्ही सुमारे 1650 उड्डाणं करू शकलो.
610 कोटींचा रिफंड
तर दुसरीकडे इंडिगो कंपनीने रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा म्हणजेच रिफंड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शनिवारपर्यंत 3 हजार बॅगा या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. देशातील विमान वाहतूक नेटवर्क वेगाने सामान्य होत आहे आणि ऑपरेशन्स पूर्णपणे स्थिर होईपर्यंत सर्व सुधारात्मक उपाययोजना लागू राहतील असे सरकारने सांगितलं. रद्द केलेल्या विमानांच्या तिकिटांचा रिफंड रविवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्याचे आणि पुढील 48 तासांच्या आत प्रवाशांना उरलेले सामान पोहोचवण्याचे निर्देश शनिवारी सरकारने दिले होते. इंडिगोने आतापर्यंत 610 कोटी रुपयांची परतफेड प्रक्रिया पूर्ण केली आहे असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले. रद्द झालेल्या विमानांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांच्या प्रवासाचे वेळापत्रक बदलण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत जेणेकरून परतफेड आणि रीबुकिंगशी संबंधित समस्या लवकर सोडवता येतील असंही स्पष्ट करण्यात आलं.
