मोठी बातमी! जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक सुरू, सुरक्षा दलांनी जैशच्या दहशतवाद्यांना घेरलं
किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दचन भागात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असल्याची माहिती आहे.

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दचन भागात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असल्याची माहिती आहे. सध्या या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांना या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई केली जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी या परिसराला पूर्णपणे वेढा घातला आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. आज दुपारी ही चकमक सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सुरक्षा दलाकडून या भागावर लक्ष ठेवले जात आहे.
याआधी शनिवारी काउंटर-इंटेलिजन्स काश्मीरच्या (सीआयके) युनिटने काश्मीरमधील 4 जिल्ह्यांतील 10 वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. सीमेपलीकडून जैश-ए-मोहम्मद कमांडर अब्दुल्लाह गाजीद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्लीपर सेल आणि भरती नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी ही शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. पुलवामा, श्रीनगर आणि बडगाम या काही जिल्ह्यांमधील ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती.
दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी मोहीम
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत किश्तवाडमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली होती. तसेच राजौरी, पूंछ, रियासी, उधमपूर, डोडा आणि किश्तवाड यासारख्या डोंगराळ जिल्ह्यांमध्येही 70 पेक्षा जास्त शोध मोहीमा राबवण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
50-60 दहशतवादी सक्रिय
समोर आलेल्या माहितीनुसार, राजौरी, पूंछ, दोडा, किश्तवाड, रियासी आणि उधमपूर या जिल्ह्यांमध्ये 50 ते 60 दहशतवादी सक्रिय आहेत. यातील बरेच दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. ते छोटे ग्रृप बनवून कारवाया करत आहेत. तसेच नियंत्रण रेषेवरील 70 पेक्षा अधिक दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र सैन्याच्या सतर्कतेमुळे या दहशतवाद्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.
