घरात सापडली ३५ कोटी रुपयांची रोकड, ईडीकडून ग्रामीण विकास मंत्र्याला अटक
ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने आधीच अटक केली आहे. आता त्यांच्याच सरकारमधील मंत्री यांच्या एका फ्लॅटमध्ये ३५ कोटींची रोकड सापडल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आज त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

देशात ईडीची कारवाई सुरुच आहे. ईडीच्या जाळ्यात आता आणखी एक मोठा नेता सापडला आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना ईडीने अटक केलीये. आज सकाळी चौकशीसाठी ते ईडी कार्यालयात आले होते. ईडीने 10 तासांहून अधिक तास त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे. ईडीने मंत्र्यांचे खाजगी सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर आलम यांना देखील याआधीच अटक केली होती. जहांगीर आलम यांच्या घरातून ईडीने कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
झारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम मंगळवारी सकाळी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते. जवळपास १० तास चौकशीनंतर त्यांनी ईडीने अटक केली. राज्याचे ग्रामविकास मंत्री आलम यांना काल रात्री ईडीने घरी जाण्याची परवानगी दिली होती, मात्र आज त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
ईडीने 35 कोटींहून अधिक रक्कम जप्त
गेल्या आठवड्यात ईडीने आलमगीर आलम यांचे पर्सनल सेक्रेटरी आणि राज्य प्रशासकीय सेवा अधिकारी संजीव कुमार लाल आणि घरातील नोकर जहांगीर आलम यांना त्यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून 35 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त केली होती. बेहिशेबी रोकड मोजण्यासाठी अनेक मोजणी यंत्रे आणण्यात आली होती. याशिवाय जहांगीर आलमच्या फ्लॅटमधून काही दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. हा सगळा पैसा ग्रामीण भागातील रस्ते बांधणीच्या टेंडरच्या बदल्यात कमिशनमधून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मनी लाँड्रिंगचा तपास राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. काँग्रेस नेते आलमगीर आलम झारखंडमध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत. ते विधानसभेत पाकूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. झारखंड ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात हा छापा टाकण्यात आला. ज्यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. यानंतर हा तपास आलमगीर आलम यांच्यापर्यंत पोहोचला. ज्यामध्ये आज त्यांना अटक करण्यात आली आहे.