ज्या राज्यात गेला तिथे एक बायको, 27 बायकांचा दादला, कोणी सीए तर कोणी डॉक्टर; अखेर लखोबा ईडीच्या जाळ्यात
ईडीने एका लखोबा लोखंडेला अटक केली आहे. अनेक बायकांशी विवाह करून त्यांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने आतापर्यंत 27 महिलांशी विवाह केल्याचं उघड झालं आहे.

भुवनेश्वर : ईडीने ओडिशातून (Odisha) एका लखोबा लोखंडेला पकडलं आहे. रमेश स्वॅन ऊर्फ बिभू प्रकाश स्वॅन असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या करामती ऐकाल तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. ईडीने या व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंगच्या (money laundering) प्रकरणात अटक केली आहे. पण याची कसून चौकशी केली असता त्याने 10 राज्यात एक दोन नव्हे तर 27 बायका (married 27 women)केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या राज्यात गेला तिथे लग्न केलं. लग्नानंतर या स्त्रियांची लाखो रुपयांची फसवणूक करून पळून गेला. विशेष म्हणजे डॉक्टर, सीए आणि मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या महिलांनाही त्याने ठकवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रमेश स्वॅन ऊर्फ बिभू प्रकाश स्वॅन याला 2011मध्ये हैदराबाद येथे अटक करण्यात आली होती. तुमच्या मुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश देतो असं सांगून काही पालकांकडून एकूण 2 कोटी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर त्याने 2006मध्ये केरळच्या 13 बॅकांना 128 बनावट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक कोटीची फसवणूक केली होती. या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती.
आठ महिन्यांपासून रडारवर
ओडिशा पोलिसांची एक टीम गेल्या आठ महिन्यांपासून स्वॅनवर नजर ठेवून होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला 13 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. 2021च्या मे महिन्यात स्वॅनच्या दिल्लीत राहणाऱ्या पत्नीने पोलिसात तक्रार केली होती. स्वॅनने तिची फसवणूक केली होती. त्याने या महिलेसोबत 2018मध्ये विवाह केला होता. स्वॅनने भुवनेश्वरमध्ये तीन अपार्टमेंट घेतले होते. त्या तिन्ही अपार्टमेंटमध्ये त्याने त्याच्या तीन बायकांना ठेवलं होतं. बँक खाते फ्रिज झाल्याचा बहाना करून या सर्व बायकांकडून पैसे उधार घ्यायचा. त्यानंतर तिथून पळून जायचा आणि दुसरं लग्न करायचा.
या स्त्रीयांशी लग्न केलं
आयटीबीपीची एक सहायक कमांडेंट
आसाममध्ये राहणारी डॉक्टर
छत्तीसगडमध्ये राहणारी चार्टर्ड अकाउंटेंट
सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालयाची वकील
केरळच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी
पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात स्वॅनची पत्नी डॉ. कमला सेठी, तिची सावत्र बहीण आणि डॉक्टरांना अटक केली होती. मात्र, नंतर त्यांना जामिनावर अटक केली. स्वॅन हा 66 वर्षाचा आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी ओडिशा पोलीस ईडीच्या संपर्कात आहे. त्याच्या सर्व फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू आहे. त्याच्या खात्यांची चौकशी करून आर्थिक देवाणघेवाणीची माहिती घेतली जात आहे. त्याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी रिमांड मागितली आहे.
