आता पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, भारत आणखी 2 मोठे निर्णय घेण्याची शक्यता!
भारत आणखी दोन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या दोन निर्णयानंतर पाकिस्तानला आणखी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याच भूमिकेतून भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. इतरही अनेक निर्णय भारताने घेतले आहे. असे असतानाच आता भारत आणखी दोन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या दोन निर्णयानंतर पाकिस्तानला आणखी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
भारत नेमके कोणते निर्णय घेण्याची शक्यता?
भारत पाकिस्तासोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारत पाकिस्तानच्या विमानांसाठी आपले हवाईक्षेत्र बंद करण्याची शक्यता आहे. तसेच भारत पाकिस्तानच्या जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी घालण्याचीही शक्यता आहे. सरकार त्यावर विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.
पाकिस्तानवर नेमका काय परिणाम पडणार?
भारताने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी घातली तर, पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. पाकिस्तान त्यांचे सामानाने भरलेले जहाज भारतात आणू शकत नाही. त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेला माल ते भारतासह इतर देशातही पोहोचवू शकणार नाहीत. मालवाहतुकीसाठी पाकिस्तानचा खर्च वाढेल. पाकिस्तानला संपूर्ण जगात व्यापार करण्यासाठी भारतीय बंदरं फार महत्त्वाची आहेत. मात्र भारताने पाकिस्तानी जहाजांना बंदरावर येण्यास मनाई केली तर त्याचा चांगलाच फटका पाकिस्तानला बसणार आहे.
भारत पाकिस्तानसाठी हवाईक्षेत्र बंद करण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताच्या विमानांना त्यांचे हवाईक्षेत्र बंद केले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात पाच निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताने प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता भारतही पाकिस्तानी विमानांना हवाईक्षेत्र बंद करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पाकिस्तानातील विमान प्रवासाचा खर्च वाढणार आहे.
