Narendra Modi : माझ्या प्रिय देशवासियांनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवाळीनिमित्ताने खास संदेश काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीनिमित्त देशवासियांना खास संदेश दिला. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही दुसरी दिवाळी असल्याचे सांगत, त्यांनी प्रभू रामांच्या शिकवणीवर भर दिला. ऑपरेशन सिंदूर, नक्षलवादमुक्ती आणि जीएसटी कपातीसारख्या 'नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स'चा उल्लेख केला. भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून स्वदेशी, स्वच्छता व आरोग्यासारख्या नागरिकांच्या कर्तव्यावर त्यांनी जोर दिला.

देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत संवाद साधून फराळही केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत भावनात्मक आणि प्रेरणादायी संदेशच मोदींनी देशातील नागरिकांना दिला आहे. या शुभेच्छा संदेशात मोदींनी अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेखही केला आहे. ही दुसरी दिवाळी आहे. आज रामललाची जन्मभूमी दिवाळीनिमित्ता प्रकाशाने न्हाऊन निघाली आहे, असं सांगतानाच प्रभू राम आपल्याला मर्यादेचं पालन करायला शिकवतात. आणि अन्यायाविरोधात ठाम उभे राहण्यासही, असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी या संदेशात नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला आहे. भारताने या मोहिमेत मर्यादेचं पालनही केलं आहे आणि अन्यायाचा बदलाही घेतला आहे, असं सांगतानाच त्यांनी याला श्रीरामाच्या शिकवणुकीचं हे जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मोदींचा दिवाळीनिमित्त देशवासियांसाठीचा संदेश…
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ऊर्जा आणि उल्हासाने भरलेल्या दिवाळीच्या या पावन पर्वावर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे. प्रभू राम आपल्याला मर्यादेचं पालन करायला शिकवतात. तसेच अन्याया विरोधात लढण्याची शिकवणही देतात. याचं जिवंत उदाहरण आपण काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाहिलं आहे. ऑपरेशन सिंदूर वेळी भारताने मर्यादेचं पालनही केलं आणि अन्यायाचा बदलाही घेतला आहे.
यावेळची दिवाळी यासाठीही विशेष आहे की, देशात अनेक जिल्ह्यातील दूर दूरच्या क्षेत्रात पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे पेटणार आहेत. ज्या भागातून नक्षलवाद आणि माओवाद मुळातून उपटून टाकण्यात आला आहे, असे हे जिल्हे आहेत. अनेक लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून कसा विकासाच्या मुख्यधारेत प्रवेश केला हे आपण पाहिलंच आहे. या लोकांनी संविधानावर आस्था व्यक्त केली आहे. देशासाठी ही मोठी उपलब्धीच आहे. या सर्व यशांमध्ये गेलाया काही दिवसांपासून देशात नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सची सुरुवातही झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटीत कपात करण्यात आली आहे. जीएसटी बचत उत्सवात देशवासियांचे हजारो करोड रुपये वाचले आहेत.
अनेक संकटातून जात असलेल्या जगात आपला भारत स्थिर आणि संवेदनशीलतेचं प्रतिक म्हणून उदयास आलेला आहे. येत्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यस्था होणार आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात एक नागरिक म्हणून देशाच्या प्रती आपलं कर्तव्य पार पाडण्याचं आपलं दायित्व आहे.
आपण स्वदेशीचा अंगिकार केला पाहिजे. तसेच हे स्वदेशी आहे, असं आपण अभिमानाने म्हटलं पाहिजे. आपण एक भारत, श्रेष्ठ भारताची भावना वाढवली पाहिजे. आपण प्रत्येक भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपण स्वच्छतेचं पालन केलं पाहिजे. आपण आपल्या आरोग्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आहारातील तेलाचं प्रमाण 10 टक्के कमी करा. योग करा. हे सर्व प्रयत्न आपल्याला गतीपासून विकसित भारताकडे घेऊन जातील.
जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो, तर त्याचा प्रकाश कमी होत नाही, तर तो अधिक वाढतो. याच भावनेने आपल्याला या दिवाळीत आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला, सद्भाव, सहयोग आणि सकारात्मकतेचे दिवे लावले पाहिजे, हिच आपल्याला दिवाळी निमित्ताने शिकवण मिळते. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमचा,
नरेंद्र मोदी
