उत्तराखंडमध्ये हाहा:कार, नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये, 1200 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर रोजी डेहराडूनचा दौरा करत तेथील बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच आपत्तीग्रस्त लोकांच्या सहकार्यासाठी मोदी यांनी 1200 कोटी रुपयांच्या आर्थिक सहकार्याची घोषणा केली.

Narendra Modi Uttarakhand Visit : उत्तराखंडमध्ये सध्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. पावसामुळे इथे पूर आला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील याच नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन कसे चालले आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांनी डेहराडूनमध्ये जाऊन सध्या उत्तराखंडच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच तब्बल पूरग्रस्त भागासाठी तब्बल 1200 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
केंद्र सरकारतर्फे 1200 कोटी रुपयांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आढावा बैठक घेतली. तसेच पुरामध्ये नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक मदत मिळावी तसेच आपत्तीग्रस्त लोकांचे आयुष्य पूर्ववत व्हावे यासाठी मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे 1200 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सोबतच त्यांनी या आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाईल, असे जाहीर केले.
DRF, SDRF च्या जवानांची घेतली भेट
उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीत ज्या लहान मुलांचे आई-वडील मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांनाही पीएम केअर फंडातून सर्वसमावेशक अशी मदत केली जाईल, असेही यावेळी मोदी यांनी सांगितले. पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांप्रती यावेळी मोदी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. तसेच DRF, SDRF चे जवान आणि आपदा मित्रांचाही मोदींनी भेट घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. उत्तराखंड राज्याला पुन्हा एकदा लवकरात लवकर उभे राहता यावे यासाठी केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देईल. तसेच ज्या ठिकाणी नासधूस झालेली आहे त्या भागात इमारतींची पुनर्बांधणी तसेच इतर कामासांठी केंद्र सरकारचे सहकार्य असेल अशी ग्वाही यावेळी मोदी यांनी दिली.
अनेकांचे संसार उद्ध्वस्त, अनेकांचा मृत्यू
दरम्यान, सध्याच्या कठीण काळातून बाहेर निघण्यासाठी केंद्र सरकार उत्तराखंड सरकारला पूर्ण सहकार्य करणार आहे. उत्तराखंडमध्ये भूस्खलन तसेच पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे मृत्यू झाले असून आता पीडित लोकांना पुन्हा एकदा नव्याने उभे राहावे लागणार आहे.
