‘भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे, जर…’; ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले मोदी?
भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा पाकिस्तानी सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मोदींनी दिला आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर भारतानं ऑपरेश सिंदूर राबवून या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअर बेसला भेट दिली. तिथे त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला, त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी?
भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा पाकिस्तानी सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ. हे उत्तर आमच्या अटींवर देऊ. या निर्णायमागचा आधार आणि विश्वास हे तुमचं धैर्य, शौर्य, साहस आणि सजगता आहे. तुमचं धैर्य असंच कायम ठेवा. आपल्याला कायम सावध आणि तयार राहिलं पाहिजे. आपल्याला शत्रूंना आठवण करून देत राहायचं आहे की, हा नवा भारत आहे. या भारताला शांतता हवी, पण मानवतेवर हल्ला झाला तर हा भारत युद्धाच्या मोहिमेत शत्रूंना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, पाकिस्तानचे ड्रोन, त्यांचे यूएव्ही, पाकिस्तानचे एअरक्राफ्ट, त्यांचे मिसाईल आमच्या सशक्त तंत्रज्ञानापुढे फेल गेले. तुम्ही खूप चांगलं काम केलं. दहशतवादाविरूद्ध भारताची लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. आता टेरर अटॅक झाला तर भारत उत्तर देईल आणि पक्कं उत्तर देईल. आपण सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक द्वारे पाहिलं आहे. आता ऑपरेशन सिंदूर भारताचं न्यू नॉर्मल आहे, भारताकडे जर डोळे वटारुन बघितलं तर खात्माच असा इशारा यावेळी मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
