Stampede in Bangalore : बंगळुरुतील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, नक्की काय म्हटलं?
PM Narendra Modi Stampede in Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाला गाळबोट लागलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पीएमओकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर घरच्या स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर एकच गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. चाहत्यांनी स्टेडियमध्ये जाण्यासाठी गेटवर गर्दी केली होती. चाहत्यांना विनंती करुनही ते ऐकत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बंगळुरुतील या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय? जाणू घेऊयात.
“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकर बरं व्हावं अशी मी प्रार्थना करतो”, असं पीएमओ एक्स अकाउंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.
दुर्घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह
एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या दुर्घटनेनंतर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर अवघ्या 18 तासांतच सत्कार समारंभाचं आयोजन करण्याची घाई करण्यात का आली? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट
The mishap in Bengaluru is absolutely heartrending. In this tragic hour, my thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that those who are injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2025
दुर्घटनेनंतर जोरदार राजकारण, राजीनाम्याची मागणी
दरम्यान बंगळुरुतील या दुर्घटनेनंतर आता राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या सर्व घटनेबाबत जाहीरपणे माफी मागितली. “चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे मी पोलिसांना दोष देणार नाही. यात पोलिसांचा दोष नाही. या सर्व दुर्घटनेबद्दल मी माफी मागतो”, असं डी के शिवकुमार म्हणाले. तर सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
