JCB पाहायला 10 हजार लोकं उभे ठाकतात, मोदी इतक्याच लोकसंख्येच्या देशांना भेटतात, भगवंत मान यांच्या वक्तव्याने नवे वादंग
Bhagwant Mann attack on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौर्यावर होते. सात दिवसांत त्यांना चार देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. त्यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जोरदार टीका केली. त्यावरून एकच वादंग उठले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स संमेलनानिमित्त पाच देशांच्या यात्रेवर होते. या दौर्यात त्यांना चार देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. या दौऱ्यात अनेक द्विपक्षीय मुद्यांवर या देशांशी त्यांनी चर्चा केली. करार केले. काही देशात तर अनेक वर्षांनी एखादा भारतीय पंतप्रधान पोहचला होता. या देशांशी भारताचे संबंध दृढ झाले. पण या दौऱ्यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
काय म्हणाले मान ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील, घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटीना आणि नामीबिया या देशाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर मान यांनी टीका केली. आपले पंतप्रधान अशा देशांच्या दौऱ्यावर होते, ज्यांची लोकसंख्या 10 हजारांपेक्षा पण जास्त नाही. इतके लोक तर आपल्याकडे जेसीबी पाहायला जमतात, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याने वादंग उठले.
परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला. मान यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचे आणि एखाद्या राज्याच्या प्रमुखाला असे वक्तव्य शोभत नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी मान यांचे नाव न घेता, “आम्ही आपल्या मित्र राष्ट्रांसोबतच्या भारताच्या संबंधांबद्दल काही राज्यातील प्रमुखांनी केलेल्या टिप्पण्या वाचल्या. त्या अत्यंत खेदजनक आहेत आणि केंद्र सरकार अशा विधानांना सहमती देत नाही.” असे ते म्हणाले.
9 वर्षांत 27 देशांकडून सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 27 देशांनी सन्मानित केले आहे. 2016 पासून त्यांना विविध देशांनी पुरस्कार दिले. गेल्या 9 वर्षांत पीएम मोदी यांचा 27 देशांनी गौरव केला. 2025 मध्ये जुलै हा सातवा महिना सुरू आहे. या कालावधीत त्यांना 7 पुरस्कार मिळाले आहेत. मोदींना जे 27 पुरस्कार मिळाले त्यात 8 मुस्लिम देशांनी त्यांचा सन्मान केला आहे. यामध्ये कुवैत, इजिप्त, बहरीन, मालदीव, संयुक्त अरब अमिरात, फिलिस्तीन, अफगाणिस्तान, सौदी अरब या देशांचा समावेश आहे.
