तीन वर्षे फेसबुक आणि इंस्टा वापरण्यास मनाई, हायकोर्टाने दिला तरुणाला सशर्त जामीन, काय नेमके प्रकरण ?
अलिकडे सोशल मीडियावर अबालवृद्ध बिझी असतात. त्यामुळे सोशल मीडियावर बंदी केल्याने नेपाळसारख्या आपल्या शेजारील देशात सत्तापालट देखील झाला.परंतू आता एका प्रकरणात कोर्टानेच एका तरुणावर तीन वर्षे सोशल मीडिया वापरण्याची बंदी घातली आहे.

आज कालच्या जगात सोशल मीडियाचे प्रचंड क्रेझ वाढले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला मोबाईल आणि सोशल मीडिया पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. अशा एक हैराण करणारे प्रकरण घडले आहे. राजस्थानातील हे प्रकरण सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे, येथे सोशल मीडियाचा दुरुपयोग प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने अनोखा निकाल सुनावला आहे.
वास्तविक एका युवकाने एक फेक अकाऊंट तयार करुन २३ वर्षांच्या विवाहितेचा फोटो एडीट करुन व्हायरल केला होता. हे प्रकरण अखेर कोर्टात पोहचले. सुनावणी दरम्यान युवकाला जामीन देताना कोर्टाने अट घातली की आरोपींनी पुढचे तीन वर्षे सोशल मीडियाचा वापर करायचा नाही. याशिवाय पीडितेचा फोटोही डीलिट करण्याचे आदेश संबंधित तरुणाला दिले.
अशी अटी का घातली ?
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती अशोक जैन यांनी सर्शत जामीन मंजूर तर केलाच परंतू अटी अत्यंत कठोर लादल्या आहेत. ते म्हणाले की संबंधित तरुणाने जामीन मिळताच तीन वर्षांपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहावे. तसेच पीडितेच्या कुटुंबांशी कोणताही संपर्क करु नये. कोर्टाने या तरुणाला या विवाहितेचा फोटोही डीलीट करायला सांगितला.
या प्रकरणातील वकील गिरीश खंडेलवाल यांनी सांगितले की न्यायमूर्ती अशोक जैन यांनी स्पष्ट केले की या युवकाने त्याच्याकडे पीडितेचा फोटो किंवा व्हिडीओ आहे की नाही या संदर्भात एक शपथ पत्रही द्यावे. जर जामीनाच्या अटीचे उलंघन केले तर त्याचा जामीन ताबडतोब रद्द होईल आणि त्याला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागेल.
युवकावर आरोप काय होता ?
या प्रकरणा संदर्भात सरकारी वकीलांनी कोर्टाला सांगितले की या युवकांने खोटे अकाऊंटने विवाहितेचा फोटो शेअर केला आणि तिच्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. या स्थितीत युवकाला विनाशर्त जामीन देणे चुकीचे आहे. परंतू बचाव पक्षाने दावा केला आहे की या युवकाला खोट्या केसमध्ये गुंतवले जात आहे.
