अयोध्या येथील मशिदीला ‘या’ स्वातंत्र्य सेनानीचे नाव, लवकरच IICF घोषणा करणार

अयोध्या येथे बांधल्या जाणाऱ्या मशिदीला कोणत्याही मुघल बादशाहाचे नाव दिले जाणार नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सेनानी मौलवी अहमदुल्ला शाह (Maulvi Ahmadullah Shah) यांना ही मशीद समर्पित केली जाईल. ( Ayodhya mosque Maulvi Ahmadullah Shah)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:21 PM, 25 Jan 2021
अयोध्या येथील मशिदीला 'या' स्वातंत्र्य सेनानीचे नाव, लवकरच IICF घोषणा करणार
अयोध्या येथील मशिदीचा काल्पनिक आराखडा.

लखनऊ : अयोध्या येथे एकीकडे राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर येथे मशिदीचे बांधकाम मंगळावारी (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावेळी बांधल्या जाणाऱ्या या मशिदीला कोणत्याही मुघल बादशाहाचे नाव दिले जाणार नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसेनानी मौलवी अहमदुल्ला शाह (Maulvi Ahmadullah Shah) यांना ही मशीद समर्पित केली जाईल, असे सांगितले जात आहे. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत आहेत. (The mosque in Ayodhya will be named after the freedom fighter Maulvi Ahmadullah Shah announcement will done by IIBF)

अयोध्या जिल्ह्यात धन्नीपूर गावात मोठ्या मशिदीचे निर्माण केले जात आहे. याविषयी बोलताना फाउंडेशनचे प्रवक्ता अतहर हुसैन यांनी याबाबत अधिक सांगितले आहे. “येथे बांधण्यात येणाऱ्या मशिदीला कोणत्याही मुघल बादशाहाचे नाव दिले जाणार नाही. तसेच, ट्रस्टच्या या निर्णयारुन देशातील नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. आलेल्या सूचनांचा अभ्यास करुन लवकरच याबाबत निर्णय जारी करण्यात येईल,” असे अतहर हुसैन यांनी सांगितले.

क्रांतीकारक अहमदुल्ला शाह कोण आहेत?

अतहर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार 1857 च्या राष्ट्रीय उठावात क्रांतीकारक अहमदुल्ला शाह यांनी मोठी भूमिका निभावली होती. ब्रिटीश सेनेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्या करारीपणाची नोंद आपल्या पुस्तकात करुन ठेवलेली आहे. मौलाना अहमदुल्ला शाह यांच्या नेतृत्वाखाली फैजाबादमधील सराय नावाच्या मशिदीमध्ये क्रांतिकारी तसेच देशाच्या स्वातंत्र्यविषयक कारवाया आखल्या जायच्या.

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार धन्नीपूर येथे बांधल्या जाणाऱ्या मशिदीला मागील वर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी मिळालेली आहे. लखनऊचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रोफेसर एस. एम. अख्तर यांनी मशिदीची डिझाईन तयार केलं आहे. पारंपरिक आणि आधूनिक बांधकाम शैलीचा मिलाफ नव्या मशिदीमध्ये असेल.

मशिदीमध्ये काय काय असणार?

येथे बांधल्या जाणाऱ्या मशिदीमध्ये अनेक गोष्टी असणार आहेत. येथे पाच भूखंडामध्ये रुग्णालय, मशीद, पुस्तकालय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक रिसर्च सेंटर, सामूहिक स्वयंपाकगृह या सर्वांचा समावेश असेल. अयोध्या येथील विकास प्राधिकरणाने या आरखड्याला मंजुरी दिल्यानंतर मशिदीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु केले जाईल.

दरम्यान, मशिदीच्या बांधकामाची प्रत्यक्ष सुरुवात ही प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवून आणि नऊ विश्वस्तांकडून वृक्षारोपण करुन केली जाईल, असेही सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

Ayodhya Dhannipur Masjid: 30 किमी अंतराने संपला 28 वर्षांचा संघर्ष, हा ‘विविधतेत एकता’ असलेला भारत

बाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश

(The mosque in Ayodhya will be named after the freedom fighter Maulvi Ahmadullah Shah announcement will done by IIBF)