Most expensive wedding of India : पाण्यासारखा पैसा ओतला… ‘हे’ होतं देशातील सर्वाधिक महागडं लग्न, एवढ्या पैशांत तर अख्खं शहर जेवून जाईल..!
Most expensive wedding of India : या लग्नात वधूने 15 कोटी रुपयांची साडी आणि 25 कोटी रुपयांचा नेकलेस परिधान केला होता. पाहुण्यांसाठी 5 आणि 3 स्टार हॉटेलच्या खोल्याही बूक करण्यात आल्या होता. त्यांच्यासाठी हजारो कॅब्स आणि हेलिकॉप्टर्सही तैनात होती.

Most expensive wedding : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. आपलं लग्न सगळ्यांच्याच्या आठवणीत राहील, असं व्हावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. रपण त्याच नादात काही जण बराच पैसा खर्च करतात. काही लोक तर असेही असतात लग्नात धामधूम करण्यासाठी कर्जही काढतात, आणि नंतर त्यामुळेच हवालदिल होता. पण ज्यांच्याकडे अगणित संपत्ती असतात ते तर लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करतात. इकडचा-तिकडचा जराही विचार न करता, सढळ हाताने खर्च करतात आणि मोठ्या धामधूमीत लग्न करतात. अशाच एका लग्नाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जे या देशातील आत्तापर्यंतचं सर्वाधिक श्रीमंत लग्न होतं. मुलीच्या लग्नासाठी तिच्या पित्याने कोणतीच कसर सोडली नाही. अडानी, अंबानी किंवा एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या मुलीचं हे लग्न असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पण हे खरं नाही.
देशातील सर्वात महागड्या लग्नात एवढा पैसा खर्च करण्यात आला की त्या पैशांत राजधानी दिल्लीतील संपूर्ण जनता पोटभर जेवू शकेल. हे लग्न एका मोठ्या व्यापारी कुटुंबातील किंवा बॉलिवूड सेलिब्रिटीचं नव्हतं, तर ते लग्न होतं कर्नाटकचे माजी मंत्री, जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचं. माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी रेड्डी हिचं लग्न विवाह हैदराबाद येथील व्यापारी विक्रम देव रेड्डी यांचा मुलगा राजीव रेड्डीशी झालं. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नात 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानुसार पहायला गेलं तर एवढ्या पैशात दिल्लीतील सगळी , कोट्यवधी लोकं एकवेळ पोटभर जेवू शकतील. या लग्नातील पत्रिकेचीच किंमत सुमारे 5 कोटी रुपये होती, अशीही माहिती समोर आली होती.
5 दिवसांच्या लग्नात 50 हजार पाहुण्यांची हजेरी
जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी यांचा विवाह 6 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. हे लग्न 5 दिवस चालले. त्यासाठी जगभरातून 50,000 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. जनार्दन रेड्डी यांनी बंगळुरूमधील 5 आणि 3 स्टार हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी 1500 खोल्या बूक केल्या होत्या. इतकेच नाही तर पाहुण्यांच्या वाहतुकीसाठी सुमारे 2000 कॅब भाड्याने घेतल्या होत्या. तर व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी 15 हेलिकॉप्टर्सही बूक केली होती. या लग्नासाठी सुमारे तीन हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
वधूने नेसली 17 कोटींची साडी
या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. लग्नात वधी, ब्राह्मणी रेड्डी हिने, सोन्याच्या धाग्यांनी बनवलेली सुंदर लाल कांजीवरम साडी परिधान केली होती. ही साडी प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केली होती. त्याची किंमत सुमारे 17 कोटी रुपये होती. एवढंच नव्हे तर तिने साडीला मॅचिंग असा, 25 कोटी रुपयांचा डायमंड चोकर नेकलेसही लग्नात घातला होता. याशिवाय तिने पंचदला, मांग टिक्का, कमरबंद आणि केसांमध्येही अनेक ॲक्सेसरी लावल्या होत्या. तिच्या दागिन्यांचीच किंमत 90 कोटी रुपये होती. मुंबईहून खास मेकअप आर्टिस्ट बोलावले होते. तसेच, 50 हून अधिक उत्कृष्ट मेकअप आर्टिस्टची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी एकूण 30 लाख रुपये खर्च करण्यात आले.
एलसीडी स्क्रीन प्लेइंग कार्डद्वारे पाठवले निमंत्रण
लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी एलसीडी स्क्रीन प्लेइंग कार्ड बनवण्यात आले होते. त्याचा बॉक्स उघडताच रेड्डी कुटुंबावर चित्रित केलेले गाणे प्ले व्हायचे. बंगळुरू येथील पॅलेस मैदानावर हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना 40 आलिशान बैलगाड्यांमध्ये गेटमधून आत नेण्यात आले. बॉलीवूडमधील आर्ट डिरेक्टर्सनी विजयनगर शैलीतील मंदिरांचे अनेक सेट उभारले होते. जेवणाची जागा बेल्लारी गावासारखी केली होती. रेड्डी यांचे मूळ गाव बेल्लारी आहे.
खाण घोटाळ्यात आलं रेड्डींचं नाव
जनार्दन रेड्डी हे केवळ राजकारणीच नव्हे तर खाण व्यावसायिकही आहेत. ते कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. नंतर जनार्दन रेड्डी यांचे नाव खाण घोटाळ्यात पुढे आले होते.
