एक तासात असा कोणता झाला आजार? उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याने देशभरात एकच सवाल, जगदीप धनखड कशामुळे नाराज?
Jagdeep Dhangad Resignation : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य तक्रारीचे कारण पुढे करत राजीनामा दिला. या अचानक राजीनाम्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. एका तासातच उपराष्ट्रपतींना असा कोणता आजार झाला की, त्यांनी राजीनामा दिला असा सवाल त्यांनी केला.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. आरोग्याच्या कुरबुरीने राजीनामा देत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपावला. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे. एका तासातच असा कोणता आजार झाला की, त्यांना राजीनामा द्यावा लागला असा सवाल विरोधक विचारत आहेत. तर धनखड यांच्या आरोग्याविषयी सुद्धा विरोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसचे खासदार इमरान मसूदसह इतर अनेक नेत्यांनी याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“ते संपूर्ण वेळ संसद भवनात होते. मग केवळ एका तासात असे झाले तरी काय की त्यांना राजीनामा द्यावा लागला? ते लवकर बरे होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे. पण मला राजीनाम्यामागील कारण समजले नाही.” उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
त्यांच्या राजीनाम्याने मला दुःख – कपिल सिब्बल
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने मला दुःख झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दिली. त्यांच्यासोबत माझे वैयक्तिक ऋणानुबंध होते. माझ्या कुटुंबियांशी, त्यांच्या कुटुंबियांचे चांगले संबंध होते. माझ्या वडिलांसोबत पण त्यांची चांगली मैत्री होती, असे सिब्बल म्हणाले. मी नेहमी त्यांचा आदर करतो. त्यांनी मला कधी दुखावले नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभो. ते आरोग्यदायी जीवन जगो अशी मी प्राथर्ना करतो, असे सिब्बल म्हणाले.
राजीनाम्यामागे राजकीय अस्वस्थता – मल्लू रवी
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस खासदार मल्लू रवी यांनी सरकारला खोचक टोला लगावला. उपराष्ट्रपतींनी विना कोणती तक्रार गेल्या दोन दिवसात राज्यसभेचे कामकाज पूर्ण केले. त्यावेळी त्यांनी कोणतीही शारीरिक तक्रार असल्याचा उल्लेख केला नाही. पण अचानक आरोग्याचे कारण पुढे करत त्यांनी राजीनामा दिल्याने आम्हाला चिंता वाटत आहे. मला वाटते ही आरोग्याची नाही तर राजकीय अस्वस्थता आहे. खासकरून बिहार निवडणुकीपूर्वी सरकार त्यांच्या खास व्यक्तीला या पदावर बसवू इच्छित आहे, ज्यामुळे त्यांना बिहार निवडणुकीत फायदा होईल, अशी प्रतिक्रिया मल्लू रवी यांनी व्यक्त केली.
