Tahawwur Rana Extradition : तहव्वुर राणा भारतात येताच मराठी IPS अधिकाऱ्यावर सर्वात मोठी जबाबदारी, कोण आहेत ते?
Tahawwur Rana Extradition : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसैन राणाला भारतात आणलं जातय. राणा भारतात आल्यानंतर त्याच्या चौकशीची एका मराठी IPS अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी आहे. हा शूर, धाडसी अधिकारी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांना भिडला होता.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आणि पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर राहिलेल्या तहव्वुर हुसैन राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात येत आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणाची प्रत्यर्पण रद्द करण्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याला भारतात आणण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, एका विशेष विमानाने राणाला भारतात आणलं जात आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तो भारतात पोहोचेल. राणाने मुंबईत येऊन रेकी केली होती. म्हणजे जिथे हल्ला करायचा, त्या ठिकाणांची पाहणी केली होती. या हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.
तहव्वुर हुसैन राणाला भारतात आणल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्याचा ताबा घेऊन चौकशी करेल. NIA च्या कस्टडीमध्ये त्याची चौकशी करण्याची जबाबदारी NIA चीफ आणि वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांच्यावर आहेत. योगायोग म्हणजे राणाच्या चौकशीची जबाबदारी असलेल्या सदानंद दाते यांनी 26/11 दहशतवादी हल्ला जवळून बघितला आहे. त्यांनी त्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांशी कामा हॉस्पिटलमध्ये दोन हात केले होते. सर्वसामान्यांचे प्राण वाचवले होते.
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते हे 1990 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सीनियर आयपीएस (भारतीय पुलिस सेवा) अधिकारी आहेत. भारतातील शूर आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. 2008 सालच्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्यावेळी दाखवलेल्या शौर्यासाठी सदानंद दाते विशेष करुन ओळखले जातात. सदानंद दाते यांनी महाराष्ट्र केडरमध्ये आपली सेवा दिली आहे. वेळोवेळी NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून आलेल्या लश्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी सदानंद दाते मुंबई क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते.

SWAT कमांडोज सज्ज
भारतात दाखल होताच एनआयएची टीम तहव्वुर हुसैन राणाचा ताबा घेईल. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हाय अलर्टवर ठेवण्यात आलय. सोबत SWAT कमांडोज सज्ज असतील. त्याशिवाय एअरपोर्टच्या बाहेर सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सची (CAPF) सिक्युरिटी विंग आणि स्थानिक पोलीस सज्ज असतील.
‘आज अभिनानाचा आणि आनंदाचा क्षण’
“तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं जातय हे सरकारच मोठ यश आहे. आणि हे सगळं ऑपरेशन महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे एनआयएचे प्रमुख असताना होतय हा अभिमानाचा क्षण. या घटनेने पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला होता आता राणा भारतात आल्यानंतर त्याचा अजूनच फायदा होईल. राणाला भारतात आणून त्याच्याविरोधात खटला चालवून त्याला कसाबप्रमाणेच शिक्षा व्हायला हवी. आज अभिनानाचा आणि आनंदाचा क्षण. पीडितांना अजून न्यायाच्या आशेचा किरण दिसू लागला आहे” असं निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर म्हणाले.
