सत्ताधार्‍यांची महाराष्ट्रातील प्रश्‍न सोडवण्याची कुवत नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यवतमाळमध्ये बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला (Sharad Pawar Criticize BJP) चढवला आहे.

सत्ताधार्‍यांची महाराष्ट्रातील प्रश्‍न सोडवण्याची कुवत नाही : शरद पवार

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यवतमाळमध्ये बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला (Sharad Pawar Criticize BJP) चढवला आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्याची कुवत नसल्याची घणाघाती टीका पवारांनी केली. कारखानदारी बंद होत आहे, विकास दर खालवत आहे, बेरोजगारी वाढत आहे. मात्र, हे प्रश्न सोडवण्याची कुवत सत्ताधाऱ्यांमध्ये नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. शरद पवार सध्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.

सत्ताधारी केवळ गुजरातकडून येणार्‍या सूचनांचेच पालन करतात. त्यांचा अधिक वेळ विरोधकांना शिव्या-शाप देण्यातच जात असल्याचाही आरोप शरद पवारांनी यावेळी केला. पवार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात किती कारखाने बंद पडले, किती रोजगार गेले, की आत्महत्या झाल्या याची आकडेवारी दिली तर फडणवीसांचे कतृत्व दिसेल. राज्यातील शेतीची स्थिती, बेरोजगारी, कारखानदारी, महागाई, महिलावरील अत्याचार या गंभीर प्रश्‍नांवर सत्ताधारी बोलत नाहीत. राज्याचा विकास दर खालावला आहे. सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी झाले आहे.”

सत्ताधार्‍यांकडून सीबीआय आणि ईडीचा पुरेपूर गैरवापर

सीबीआय, ईडी सारख्या संस्थांचा वापर सत्ताधार्‍यांनी पुरेपूर गैरवापर केला जात आहे. सत्तेसाठी या संस्थांचा गैरवापर हेच सरकारचे एकमेव सूत्र आहे. सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचाही आरोप शरद पवारांनी केला. पवार म्हणाले, “60 वर्षांत काँग्रेस, मित्रपक्षांच्या सरकारने कधीही स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला नाही. आज मात्र याच्या उलट स्थिती आहे. सत्तेचा गैरवापर किती टोकापर्यंत करायचा यांची कुठलीही मर्यादा सत्ताधाऱ्यांना राहिलेली नाही.”

सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांना ईडी, सीबीआय या संस्थांचा धाक दाखवला जात आहे. याचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. माझा शिखर बँकेशी कुठलाही संबंध नव्हता. मी कोणत्याही बँकेत साधा संचालकही नव्हतो. असं असतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच पद्धतीने विरोधकांना भीती दाखवली जात आहे, असा आरोप पवारांनी केला. केंद्र सरकारचं सत्तेसाठी काहीही करणे हे एकमेव धोरण असल्याचीही टीका पवारांनी मोदी शाहांचं नाव न घेता केली.

‘हवाई दलाच्या शौर्याचा राजकारणासाठी गैरवापर’

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ इतिहास रचला नाही, तर भूगोलही बदलला. मात्र, त्यांनी याचा कधीही राजकारणासाठी वापर केला नाही. मात्र, सध्या पुलवामा आणि उरीतील सैन्याच्या अतुलनीय कामाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर केला जात आहे. असा वापर करणं भारतीय सैन्यावर अविश्‍वास दाखवल्यासारखं होईल, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

गडकरींच्या कामांची पवारांकडून स्तुती

केवळ नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामंच दिसत आहेत. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केलेले दिसत नाही, असं म्हणत पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची स्तुती केली. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विदर्भातील आहे. 2 महत्त्वाचे खाते विदर्भात आहेत. तरीही विदर्भातील रस्त्यांची स्थिती वाईट आहे, असाही आरोप शरद पवारांनी केला.

‘देशाला संकटात नेणार्‍यांना सत्ताधार्‍यांना खाली खेचा’

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सुरू झालेले कारखाने या सरकारच्या काळात बंद पडले. जे सुरू आहेत त्यातील कामगार काढले जात आहेत. राज्य आणि देशाला संकटात नेणार्‍यांना सत्ताधार्‍यांना खाली खेचा, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI