पंकजा मुंडेंबरोबर प्रितम मुंडेही ओबीसी आंदोलनात उतरणार, बीडकरांना केलं ‘हे’ आवाहन

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी देखील ओबीसी आंदोलनात उडी घेतलीय.

पंकजा मुंडेंबरोबर प्रितम मुंडेही ओबीसी आंदोलनात उतरणार, बीडकरांना केलं 'हे' आवाहन
प्रीतम मुंडे, भाजप खासदार


बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी देखील ओबीसी आंदोलनात उडी घेतलीय. 26 जून रोजी भाजपच्यावतीने राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारण्यात आलंय. या ‘चक्का जाम’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज (22 जून) भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी प्रितम मुंडे यांनी देखील भूमिका मांडत बीडकरांना खास आवाहन केलंय (BJP MP Pritam Munde appeal people on protest on OBC reservation in Beed).

प्रितम मुंडे म्हणाल्या, “मी स्वतः आंदोलना वेळी जिल्ह्यात असणार आहे. आंदोलनात मोठ्या ताकदीने उतरायचे आहे. त्यासाठी सर्वांनी चांगलं नियोजन करावं.” यावेळी पंकजा मुंडे यांनीही आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या 26 जून रोजी भाजपच्यावतीने राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारण्यात आलंय. यात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे दुर्दैवी आहे. केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवावे लागेल. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने आपण यशस्वी केली आहेत, हे आंदोलनही यशस्वी करायचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांसह आंदोलनात सहभाग घेऊन जिल्हा दणाणून सोडावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

या बैठकीला खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमसेन धोंडे, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, ओबीसी मोर्चाचे डॉ. लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र मस्के यांनी केले. संचलन शंकर देशमुख यांनी केले तर देविदास नागरगोजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी तसेच ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

‘विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात; ठाण्यात शुक्रवारी ओबीसींचा आक्रोश मोर्चा

मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत

व्हिडीओ पाहा :

BJP MP Pritam Munde appeal people on protest on OBC reservation in Beed

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI