दिवस फिरले, चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी!

आंध्रातील सत्ता गेल्यानंतर चंद्राबाबूंची सुरक्षा घटवण्यात आली आहे. त्यामुळे आंध्रातील गन्नवरम विमानतळावर माजी मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबूंना चौकशीला सामोरं जावं लागलं.

दिवस फिरले, चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी!

हैदराबाद : माणसाच्या आयुष्यात दिवस कधी फिरतात हे सांगता येत नाही. राजाचा रंक कधी होतो आणि रंकाचा राजा कधी होईल हे सांगता येत नाही. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानपदासाठी लॉबिंक करणारे चंद्रबाबू नायडू यांच्याबाबतीत काहीसं असंच घडलं आहे. आंध्रातील सत्ता गेल्यानंतर चंद्राबाबूंची सुरक्षा घटवण्यात आली आहे. त्यामुळे आंध्रातील गन्नवरम विमानतळावर माजी मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबूंना चौकशीला सामोरं जावं लागलं.  विमानापर्यंत जाण्यासाठी जी व्हीआयपी सुविधा असते, त्यालाही मुकावं लागलं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे, गेटवर तपासणी करुन चंद्राबाबूंना जावं लागलं. इतकंच नाही तर त्यांना साध्या प्रवाशांप्रमाणे शटल बसमधून प्रवास करावा लागला.

आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांना झेड प्लस (Z+) सुरुक्षा मिळते. यानुसार त्यांच्यासोबत 24 तास 23 सुरक्षा रक्षक आणि गाडी असते. 2003 मध्ये तिरुपतीजवळ नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली.

दरम्यान, चंद्राबाबूंची विमानतळावर चौकशी केल्याप्रकरणी तेलुगु देसम पक्षाने आक्षेप घेतला आहे. भाजप आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पार्टी बदल्याचं राजकारण करत असल्याचा आरोप टीडीपीने केला आहे.

चंद्राबाबूंबाबत अधिकाऱ्यांचं वर्तन हे अपमानजनक होतं.अशा परिस्थितीचा सामना करणं हे खूपच संतापजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षिततेबाबत निर्णय घ्यावा, असं टीडीपीने म्हटलं आहे.