काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला

चंद्रपूर : काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी नववी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावं आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपुरात काँग्रेसने आधी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आणि धानोरकरांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मान्य करत बाळू धानोरकर यांना नवव्या यादीत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसकडून चंद्रपुरातून आता बाळू धानोरकर निवडणूक लढवणार आहेत.

दुसरीकडे, चंद्रपूर लोकसभेसाठी विनायक बांगडे यांना डावलून धानोरकरांना उमेदवारी दिल्याने बांगडे हे नाराज झाले आहेत. विनायक बांगडे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “चव्हाण-वडेट्टीवार ही जोडी काँग्रेसची शिवसेना करत आहे. पक्षाच्या अधोगतीसाठी ही जोडीच जबाबदार आहे. ते कधीही वेगळा विचार करणार नाही”, अशी घोचक टीका बांगडे यांनी केली. तसेच, सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष नाराज होतात, असेही बांगडे म्हणाले.

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारीच्या सातव्या यादीत चंद्रपूरहून कार्यकर्ते विनायक बांगडे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, या उमेदवारीवरुन सोशल मीडियावर मोठे महाभारत रंगले. कार्यकर्त्यांनी विनायक बांगडे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला चंद्रपूरची जागा मागितल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी विनायक बांगडे यांचे तिकीट कापून शिवसेनेततून आलेल्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केलं.

अशोक चव्हाण आणि आमदार विजय वडेट्टीवार सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट मिळू देत नसल्याचा आरोप विनायक बांगडे यांनी केला आहे. ही जोडी पक्षाची अधोगती करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाला जेरीस आणणारे हे लोक पक्ष रसातळाला नेतील, अशी प्रतिक्रिया विनायक बांगडे यांनी दिली. हे दोन्ही नेते व्यावसायिक असून त्यांनी काँग्रेसची शिवसेना करण्याचा घाट घातला असल्याचंही बांगडे यांनी उद्विग्नपणे सांगितलं.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असं त्यांचं पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.

Published On - 8:39 pm, Sun, 24 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI