फडणवीसांच्या छळाला कंटाळून भाजपला राम-राम, एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल

कोणत्याही राजकीय पक्षानं माझ्या राजीनाम्याची किंवा चौकशीची मागणी केली नव्हती. पण एकट्या फडणवीसांमुळे मला मनस्ताप सहन करावा लागला. एकट्या फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडतो आहोत', अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली

फडणवीसांच्या छळाला कंटाळून भाजपला राम-राम, एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

मुक्ताईनगर, जळगाव: भाजपला राम-राम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘अंजली दमानिया यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. पण फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला’, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. आपला भाजपवर किंवा केंद्रीय नेतृत्वावर रोष नाही. आपण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीतून पक्ष सोडत असल्याचं एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. (Eknath Khadse on resignation and Devendra Fadnavis)

‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खोटे आरोप करण्यात आले. पण कोणत्याही राजकीय पक्षानं माझ्या राजीनाम्याची किंवा चौकशीची मागणी केली नव्हती. पण एकट्या फडणवीसांमुळे मला मनस्ताप सहन करावा लागला. फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडतो आहोत’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एकनाथ खडसे भावनिक झाल्याचंही पाहायला मिळालं.

‘देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केलं. माझ्या कथित पीएनं लाच घेतल्याचा आरोप झाला. त्याच्यावरही पाळत ठेवली. पण तो माझा पीए नव्हता. फडणवीस यांनी एका उत्तरादरम्यान सभागृहातही पाळत ठेवल्याचं मान केलं’, असं एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत म्हणाले.

‘मी पक्षासाठी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं. ते मी त्या कालखंडात घालवलं जेव्हा दगडं, धोंडे खाल्ले, लोकं थुंकली, मारलं, वाळीत टाकलं गेलं, अशा कालखंडातून आम्ही पक्षाचं काम केलं. पक्षासाठी 40 वर्ष आम्ही काम केलं. आजही माझी भाजपशी कोणतीही तक्रार नाही. माझी फक्त देवेंद्र फडणवीसांबाबत नाराजी असल्याचं खडसे यांनी आवर्जुन सांगितलं.

चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही- खडसे

भाजपकडून आपल्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोडले तर एकाचाही फोन आला नाही, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. मात्र, पाटील यांच्याकडूनही आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही पक्षा सोडू नका, एवढंच बोललं गेल्याचं खडसे म्हणाले.

संबंधित बातम्या: 

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची अधिकृत घोषणा

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल, खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

eknath khadse on resignation and devendra fadnavis

Published On - 2:28 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI