लोकसभेत 86 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त, कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार?

अनिश बेंद्रे

Updated on: Oct 15, 2019 | 10:53 AM

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये एकूण 7 हजार 484 उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. परंतु फक्त 587 उमेदवारांनाच आपली अनामत रक्कम राखता आली.

लोकसभेत 86 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त, कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत 86 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त (LokSabha Polls Candidates lost Deposit) झाल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. लोकसभेला पराभूत झालेल्या 7 हजार 484 उमेदवारांपैकी 6 हजार 897 उमेदवारांना डिपॉझिट राखता आलं नाही. यामध्ये बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीला झालेलं 67.4 टक्के मतदान हे इतिहासातील सर्वोच्च असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. वेल्लोर वगळता देशभरात 542 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं. यामध्ये एकूण 7 हजार 484 उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. परंतु फक्त 587 उमेदवारांनाच आपली अनामत रक्कम राखता आली.

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुसरी मोदी लाट पाहायला मिळाली होती. भाजपने 303 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती.

यावेळी, बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त (LokSabha Polls Candidates lost Deposit) झालं. लोकसभेला उभ्या राहिलेल्या बसपच्या 383 पैकी तब्बल 345 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बसपचे 11 खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत. म्हणजेच केवळ 27 पराभूत उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आलं. बसपने समाजवादी पक्षाच्या जोडीने निवडणूक लढवली होती.

सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेल्या पक्षांच्या यादीत बसपनंतर दुसरा क्रमांक लागतो काँग्रेसचा. पक्षाच्या 421 पैकी 148 उमेदवारांचं डिपॉझिट गेलं. काँग्रेसचे 52 खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत. म्हणजेच 221 उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यात यश आलं.

माकपच्या 69 पैकी 51 उमेदवारांनी, तर भाकपच्या 49 पैकी 41 उमेदवारांना अनामत रकमेवर पाणी सोडावं लागलं. तर राष्ट्रवादीच्या 34 पैकी 14 उमेदवारांवर डिपॉझिट घालवण्याची वेळ आली. राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातून अवघे चार खासदार निवडून आले होते. त्यापैकी उदयनराजे भोसलेंनीही खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला.

विशेष म्हणजे भाजपने 303 जागांवर निर्विवाद यश मिळवलं. परंतु 51 जागांवर भाजपच्या उमेदवारांनाही डिपॉझिट गमवावं लागलं. भाजपप्रणित एनडीएने 542 जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी भाजपने 437 जागा लढवल्या होत्या. याचा अर्थ भाजपच्या 83 पराभूत उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली नाही.

तृणमूल काँग्रेसच्या 62 पैकी 20 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. परंतु शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली का, याची माहिती मिळालेली नाही.

डिपॉझिट जप्त होण्याचे निकष काय?

निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निश्चित अशी अनामत रक्कम भरावी लागते. जर उमेदवाराने निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, तर हीच अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते. याच स्थितीला म्हणतात उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ जप्त होणे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त (LokSabha Polls Candidates lost Deposit) केली जाते.

उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याच्या घटना अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून होत आहेत. 1951-52 च्या सर्वसाधारण निवडणुकीत 1 हजार 874 उमेदवारांपैकी 745 उमेदवारांची अनमात रक्कम जप्त झाली होती. पहिल्या सर्वसाधारण निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या एकूण 28 टक्के उमेदवारांना आपली अनामत गमावण्याची नामुष्की आली होती. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत 91 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

2014 मधील मोदी लाटेत काय झालं होतं? 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत 8 हजार 748 उमेदवारांपैकी 7 हजार 502 उमेदवारांना आपल्या जागेवर 16.6% मते मिळवण्यातही अपयश आले होते. त्यामुळे 85 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

पश्चिम त्रिपुरा, गाजियाबाद, सातारा, छतरा, फरीदाबाद या 6 लोकसभा जागांवर तर जिंकणारे उमेदवार सोडले तर उर्वरित सर्वांचीच अनामत रक्कम जप्त झाली होती. तसेच एकूण 372 जागांवर केवळ जिंकणारा उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराचीच अनामत रक्कम वाचली होती. मोदी लाट असतानाही भाजपच्या उमेदवारांची 62 लोकसभा जागांवर अनामत रक्कम जप्त झाली होती. दुसरीकडे काँग्रेसच्या 179 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

2014 च्या निवडणुकीत अनामत रक्कम जप्त (LokSabha Polls Candidates lost Deposit) होण्याचा सर्वाधिक फटका बहुजन समाज पक्षाला (बसप) बसला होता. बसपने 501 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तब्बल 445 जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामक रक्कम जप्त झाली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI