नक्षलवादाला न जुमानता मतदान, नावेतून प्रवास करत वेंगणुरवासी मतदान केंद्रावर

गडचिरोलीतील मौजा वेंगणुरवासी नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावत आहेत.

नक्षलवादाला न जुमानता मतदान, नावेतून प्रवास करत वेंगणुरवासी मतदान केंद्रावर

गडचिरोली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदान आज पार पडत आहे (Vidhansabha election voting). गडचिरोलीतील नागरिकांनी नक्षलवादाला न जुमानता 13 किमीचा प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला. काल (20 ऑक्टोबर) नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगणारे बॅनर (Naxalite Banner for Boycott Election) लावले होते. मात्र, बॅनरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांचा धमकावण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. गडचिरोलीतील मौजा वेंगणुरवासी नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावत आहेत.

नक्षलवाद्यांनी पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून गडचिरोलीतील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगितले होते. मौजा वेंगणुरवासीयांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत 13 किमीचा प्रवास करत, जंगलातून तसेच वाटेत येणाऱ्या कन्नमवार जलाशयाच्या नाल्यातून बोटीने प्रवास करत आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावत आहेत. यामाध्यमातून या लोकांनी त्यांचा लोकशाहीवर विश्वास असल्याचं स्पष्ट केलं. वेंगणुर येथील ग्रामस्थांचा नेहमीच लोकशाहीला पाठिंबा असून नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण कधीच बळी पडणार नसल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यामध्ये महिला आणि वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता.

सुरक्षेच्या कारणास्तव वेंगणुर येथील बूथ मौजा रेगडी येथे हलवला

उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील मौजा वेंगणुर येथील बूथ सुरक्षेच्या कारणास्तव मौजा रेगडी येथे हलविण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे गडचिरोली पोलीस दलातर्फे बुथवरच पोमके रेगडीचे प्रभारी अधिकारी खापरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला.

नक्षलवाद्यांना भीक न घालता वेंगणुर येथील ग्रामस्थांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याच्या कृतीचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI