‘गोकुळ’च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांना बांधून ठेवलंय!

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची (Gokul general meeting) आज वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. गोकुळ मल्टीस्टेटवरून गोकुळ दूध संघाची (Gokul general meeting)  मागच्या वर्षीची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली होती.

  • Updated On - 10:34 am, Wed, 30 October 19
'गोकुळ'च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांना बांधून ठेवलंय!

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची (Gokul general meeting) आज वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. गोकुळ मल्टीस्टेटवरून गोकुळ दूध संघाची (Gokul general meeting)  मागच्या वर्षीची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली होती. त्याचे पडसादही वर्षभर जिल्ह्याच्या राजकारणात उमटत राहिले.  काँग्रेस आमदार समर्थक सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट असं चित्र या सभेनिमित्त पाहायला मिळालं.

आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर गोकुळ मल्टीस्टेटचा ठराव सत्ताधारी गटाने मागे घेतला असला, तरी विविध मुद्द्यांवर विरोधक अजूनही आक्रमक आहेत. त्यामुळेच आजच्या सभेकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

विशेष म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव पाहता गोकुळ हे यावेळी सभेबाबत विशेष काळजी घेतली असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय सभासदांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यादेखील बांधून ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या वर्षीच्या सभेत मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची फेकाफेकी झाली होती. त्यामुळे यंदा कुणी खुर्च्या फेकून मारु नयेत म्हणून त्या आधीच बांधून ठेवण्यात आल्या आहेत.

गोकुळ मल्टीस्टेटचा निर्णय मागे

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याचा अर्थात दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा सत्तारुढ गटाचा वादग्रस्त निर्णय संचालक मंडळाने अखेर रद्द केला. वार्षिक सभेपूर्वीच गोकुळने घेतलेल्या या निर्णयान गोकुळचा सत्ताधारी गट बॅकफूटवर गेला. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचा अधिकृत ठराव सर्वसाधारण सभेत करावा अशी मागणी केल्यान आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या गोकुळ दूध संघाला मल्टीस्टेट करण्यासाठी सत्ताधारी महाडिक गटाने प्रयत्न केले होते. त्याला सतेज पाटील गटाचा प्रचंड विरोध होता. या निर्णयाला गोकुळ बचाव समितीने विरोध केला होता. त्या संदर्भात दूध उत्पादकांच्या सहभागाने गोकुळवर मोर्चा काढून मल्टीस्टेटच्या निर्णयाला विरोध केला होता. तरीही गोकुळच्या संचालक मंडळाने 30 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोकुळ मल्टीस्टेट करण्यासंबंधातील विषय मांडला होता. पण यावर कोणतीही चर्चा न होता, तसंच सभासदांचा तीव्र विरोध असूनही बेकायदेशीररित्या हा विषय मंजूर करुन घेतल्याचा आरोप होता. दरम्यान, नुकतंच 3 दिवसांपूर्वीच गोकुळ मल्टीस्टेटचा निर्णय मागे घेण्यात आला.

जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र

कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाला मल्टीस्टेट करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला होता. या निर्णयावरून गेली वर्षभर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं. गेल्यावर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही गोकुळ मल्टीस्टेट विरोधाचे पडसाद उमटले. मल्टीस्टेट विरोधाच्या निमित्ताने महाडिक विरोधकांना एकत्र करण्यात आमदार सतेज पाटील यांना यश आलं.

त्यामुळेच लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही गोकुळ मल्टीस्टेटचा विषय प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला होता. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मल्टीस्टेट समर्थन करणाऱ्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.

गोकुळ मल्टीस्टेटविरोधात दूध उत्पादकांची असलेली नाराजी पाहता अखेर गोकुळच्या सत्ताधारी गटाने मल्टीस्टेटचा ठराव मागे घेत असल्याचे जाहीर केलं.

बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याच मुद्ययावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी  आमदार सतेज पाटील गटाने केली होती. मात्र त्याआधीच गोकुळने जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवं वळण मिळणार आहे.

मल्टीस्टेटचा ठराव सत्ताधाऱ्यांनी रद्द केला असला तरी तसा ठराव बुधवारच्या सभेत करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

आता फक्त गोकुळ उरलंय

मागील वर्षी झालेल्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेवेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय संदर्भ काही प्रमाणात बदललेत. त्यामुळं हा निर्णय घेऊन सतेज पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

गोकुळचा हा निर्णय म्हणजे देर आये दुरुस्त आये असा असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय

विधानसभा निवडणुकीनंतर आता फक्त गोकुळ उरलंय म्हणणाऱ्या सतेज पाटील यांनी मल्टिस्टेटचा ठराव मागे घ्यायला लावून पुन्हा एकदा महाडिक गटाला धक्का दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या बुधवारी होणाऱ्या सभेकडे जिल्ह्याचं लक्ष आहे.

संबंधित बातम्या  

‘गोकुळ’ मल्टीस्टेटला कर्नाटकने NOC नाकारली, लढा जिंकला : सतेज पाटील 

गोकुळ मल्टिस्टेटवरुन सतेज पाटील-महादेवराव महाडिक पुन्हा आमनेसामने