लखनौ : उत्तर प्रदेशच्या 2017 मधील विधानसभेचा निकाल लागला त्यावेळी देशभरात भाजपच्या या यशाचे अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, त्यापेक्षा अधिक मोठा धक्का उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाली तेव्हा बसला. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती. मात्र, अचानक ही सर्व नावं मागे पडत आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. त्यावेळी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री का करण्यात आले हा प्रश्न अनेकदा विचारला गेला. मात्र, हा निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी त्यावेळी या निर्णयावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. आता मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी या निर्णयामागील कारणांचा खुलासा केला आहे.