अकोल्यात तरुणाने EVM फोडलं, बिघाड झाल्याने संतापला

अकोल्यात तरुणाने EVM फोडलं, बिघाड झाल्याने संतापला


अकोला : बाळापूर तालुक्यातील कवठा येथे एका तरुणाने ईव्हीएम फोडल्याचा प्रकार घडला. मशीन फोडणाऱ्याचे नाव श्रीकृष्ण रामदास घ्यारे असे आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही घटना बाळापूर तालुक्यातील कवठा येथील बूथ क्रमांक 29 येथे घडली.

आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदानात अनेक ठिकाणी EVM बिघाडामुळे गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अकोला, सोलापूर, बुलडाणा, बीड, लातूर आणि अमरावती या ठिकाणीही EVM मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या ठिकाणी बराच काळ मतदान झाले नाही. याचा थेट परिणाम मतदानावरही पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्या त्या ठिकाणी पर्यायी EVM उपलब्ध करुन मतदान सुरु करण्यात आले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला होता. आंध्र प्रदेशातील जन सेना पक्षाचे उमेदवार असलेल्या आमदाराने थेट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमचीच तोडफोड केली होती. अनंतपूर जिल्ह्यातील गुटी येथे हा प्रकार घडला होता. मधुसूदन गुप्ता (Madhusudhan Gupta) असे या तोडफोड करणाऱ्या आमदाराचे नाव होते.

अकोल्यात काँटे की लढत

अकोला लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होत आहे. याशिवाय काँग्रेसकडून हिदायत पटेल हे रिंगणात आहेत.

अकोला लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. यातील मूर्तिजापुर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला. जिल्हा परिषदांपासून महानगरपालिकेपर्यंत इथे प्रकाश आंबेडकरांच्या भारीप बहुजन महासंघाचीच सत्ता आहे. मात्र 1998 आणि 99 चा अपवाद वगळता लोकसभेला आंबेडकरांना इथून विजय मिळवता आलेला नाही. सलग तीनवेळा इथून भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे विजयी झाले आहेत.

लोककसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत, तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.