जिथे हित असेल तिथे मी जाणार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं सूचक विधान

माझ्या मतदारसंघातील हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी असणार असा सूचक इशारा साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.

जिथे हित असेल तिथे मी जाणार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं सूचक विधान


सातारा : “माझ्या मतदारसंघातील हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी असणार असा सूचक इशारा साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. साताऱ्यातील मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी हे वक्तव्य केले आहे.”

गेल्या कित्येक दिवसांपासून आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्याबाबत बोलताना ज्या पक्षांमध्ये जनतेच्या विकासाचे हित असेल आणि जो पक्ष मोठा असेल त्या पक्षात मी प्रवेश करणार. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.

“कोणत्याही प्रवेशाबाबत मी आता काहीही सांगणार नाही. त्याशिवाय जनता जे ठरवेल, त्यावर माझे पाऊल असेल असेही शिवेंद्रराजे म्हणाले. मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा साताऱ्यात सुरू आहे.”

शिवेंद्रराजे हे पक्षाच्या चौकटीबाहेर नाहीत असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीतून विधानसभेसाठी लढणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वादामुळे शिवेंद्रराजे हे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात जाण्याच्या हालचालीने पक्षश्रेष्ठी चिंतेत आहेत. त्यामुळेच शरद पवार यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राजेंमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

नुकतेच साताऱ्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते. यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी दांडी मारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI