ऑपरेशन टायगर थोपवण्यासाठी ठाकरे गट सरसावला; संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्व नेते…
आज सत्तेवर आहात. उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या. मग अशी विधाने करा. कधीकाळी आपण सहकारी होतो, उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. त्यांच्यासोबत तास न् तास चर्चा केली. आमदारकी, मंत्रीपद दिलं आहे. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी दोन वेळा विधान परिषदेत पाठवलं होतं. ही कृतज्ञता माणसात नसेल, तर माणुसकी शून्य आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे. त्यानुसार ठाकरे गटाच्या अनेकांना पक्षात घेतलं जात आहे. खासकरून कोकणातील नेत्यांना सोबत घेण्यासाठी शिंदे गटाने आखणी केली आहे. राजन साळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच शिंदे गटाने ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनाही आपल्यासोबत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाला आणखी काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ठाकरे गटही आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाने ही पडझड थांबवण्यासाठी मेगा प्लान आखला आहे.
राजापूर येथे ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख नेते जाणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आम्ही कोकणात जाणार आहोत. मी एकटा जात नाही. शिवसेनेचे प्रमुख नेते एकत्र कोकणात जाणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभेत ठाकरे गटाला कोकणात फारसं यश आलेलं नाही. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता आणि नाराजी होती. त्यातच आता नेतेही पक्ष सोडून जात असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आणि होणारी पडझड थांबवण्यासाठीच ठाकरे गटाचे प्रमुख नेते कोकणात जात असल्याचं सांगितलं जात आहे.
कसलं ऑपरेशन टायगर?
उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये नव्हते का? नेहमीच होते. कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल तर यांचं अख्खं दुकान खाली होईल, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला आहे.
निरोप उशिरा दिला
भास्कर जाधव हे शिवसेनेच्या बैठकीला आले नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या देता त्या चुकीच्या आहेत. कोकणात भास्कर जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे. बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत. भास्कर जाधव यांना बैठकीचा निरोप उशीरा गेला. अचानक बैठक ठरली होती. माझी त्यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना म्हटलं ठिक आहे, आपण ऑनलाइन चर्चा करू. पण मातोश्री परिसरात जामर असल्याने वायफायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, असं राऊत यांनी सांगितलं.
ते काय एकनाथ शिंदे आहे काय?
भास्कर जाधव यांना यायचं होतं. मी आता निघालो तर यायला 8 वाजतील असं भास्कर जाधव यांनी सांगितलं होतं. कुटुंबात लग्न असल्याने ते गुहागरला थांबले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही पक्षात चर्चा करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे. उगाच तुम्ही हे आले नाही, ते आले नाही, ते रुसले, ते फुगले करता. रुसाफुगायला ते काय एकनाथ शिंदे आहेत का? रुसून गावी जाऊन बसायला. आमचा सर्वांशी संवाद आहे. काल सर्व नेते उपस्थित होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उंदरासारखे पळाले
यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या पक्ष सोडण्यावरही भाष्य केलं. त्यांनी आता पक्ष सोडला आहे. त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. लोकसभा निवडणुकीतविनायक राऊत यांना साळवींच्या मतदारसंघात 18 हजाराचं मताधिक्य होतं. राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते, मग ते स्वतःला मताधिक्य का नाही मिळू शकले? मतदार त्यांच्यावर का नाराज होते? असा सवाल करतानाच राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते, आमदार, उपनेते होते. पक्षाने त्यांना सगळी महत्त्वाची पद दिली. सर्व काही दिलं. पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटल्या. सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते. निवडणुकीत पराभव होऊनही राहिले असते. तुम्ही उंदरासारखे पळून जाता. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळपुटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.
आम्हाला तोंडं नाहीत का?
एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल, असा इशारा रामदास कदम यांनी दिला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्यांना तोंडं नाहीत का? तोंडं सर्वांना आहेत. जो बाटगा असतो तो जोरात बांग देतो. या विषयावर फार चर्चा न केलेली बरी. त्यांचा शत्रू कोण आहे. हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ज्या बाळासाहेबांनी त्यांना सत्तेची पदं दिली, वैभव दिलं आम्हा सर्वांनाच त्यांच्या विषयी अशी विधाने करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही, असं राऊत म्हणाले.